कल्याण दि.9 मार्च :
भविष्यातील पिढीला एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) संसर्गामुळे होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने कल्याणमध्ये एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. २८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या शिबिरात ९ ते १४ वयोगटातील सुमारे १२० मुला-मुलींना मोफत लस देण्यात आली. (120 Children Aged 9–14 Receive Free HPV Vaccination in Kalyan; Initiative by Pranisha Healthcare with Support from Aditya Birla Group and Serum Pharma)
प्रणिशा हेल्थकेअर, कल्याणच्या डॉ. सोनाली पाटील यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इनर व्हील क्लब ऑफ ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. आदित्य बिर्ला ग्रुपच्या पाठबळासह सिरम फार्माच्या पुढाकारातून या शिबिराला सहकार्य मिळाले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयातील कर्मचारी तसेच वैद्यकीय प्रतिनिधींच्या मुलांना प्रथमच या लसीकरणाचा लाभ देण्यात आला. एचपीव्ही संसर्गामुळे होणाऱ्या काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षणासाठी ही लस प्रभावी मानली जाते. त्यामुळे लहान वयोगटातच लसीकरण होणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
लसीकरण शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. मेघना म्हसकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच इनर व्हील क्लब ऑफ ठाणेच्या अध्यक्षा सुखी कोपरकर, प्रकल्प समन्वयक हाटळकर आणि क्लबच्या इतर सदस्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
तर या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंदा अडवाणी, डॉ. नीता झबक तसेच शिल्पा आभाळे, स्वप्ना दुस्सा, सोनाली महाडिक, सुवर्णा बैसाणे यांनी सहकार्य केले. तसेच सिरम फार्माचे प्रतिनिधी युवराज सोनवणे, निलेश गवारे, पांडे आणि शर्मा यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. प्रशांत पाटील यांनी या उपक्रमासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, एचपीव्हीमुळे होणाऱ्या कर्करोगाविरोधात जनजागृती निर्माण करण्यासही या उपक्रमामुळे मदत होणार असल्याची माहिती प्रणिशा हेल्थकेअरच्या प्रमूख डॉ. सोनाली पाटील यांनी दिली.

