डॉक्टर, वकील, पोलीस, व्यावसायिक, भारतीय नौदलअधिकारी, दिग्दर्शक, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा समावेश
कल्याण | २४ ऑक्टोबर
यंदा महाराष्ट्रावर असणारे भीषण दुष्काळाचे सावट पाहता पाणी बचतीचा संदेश घेऊन कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील १९ सायकलिस्ट तब्बल ९०० किलोमीटरच्या सायकलवारीसाठी रवाना झाले. कल्याण ते कर्नाटकातील दांडेली असा हा डोंगररागांचा ९०० किलोमीटरचा अतिशय साहसी प्रवास असणार आहे. कल्याणातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे, रोटरी क्लब ऑफ कल्याणचे कैलास देशपांडे, व्यावसायिक संजय काळोखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दुर्गाडी चौकातून या उपक्रमाचा फ्लॅगऑफ सोहळा संपन्न झाला. (19 Cyclists Embark on a 900-KM Adventure from Kalyan to Karnataka, Spreading the Message of Water Conservation)
विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये डॉक्टर, वकील, पोलीस, व्यावसायिक, भारतीय नौदल अधिकारी, दिग्दर्शक, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. हे १९ सायकलस्वार सुमारे ९०० किलोमीटरचा प्रवास करत कर्नाटकातील दांडेलीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. कल्याण ते पुणे, पुणे ते कऱ्हाड, तेथून राधानगरी घाटमार्गे सावंतवाडी, गोवा, फोंडा घाटमार्गे हे सायकलिस्ट कर्नाटकात पोहोचणार आहेत. पश्चिम घाटातील निसर्गरम्य घाटरस्ते, नागमोडी वळणे आणि हिरव्यागार वनराईतून होणारा हा प्रवास सायकलस्वारांच्या शारीरिक क्षमतेची, सहनशक्तीची आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा ठरणार आहे. पुढील आठवड्याभरात हा ९०० किलोमीटरचा टप्पा पार केला जाणार असल्याची माहिती या उपक्रमाचे प्रमुख सायकलिस्ट डॉ. रेहनुमा यांनी दिली.
पाणी बचतीचा संदेश, पर्यावरण संवर्धनाचा ध्यास…
महाराष्ट्र आज अनेक दशकांतील भीषण अशा दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात आहे. अशावेळी इथल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला पाण्याची बचत कशी करता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा विचार या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यातील सहभागी सायकलपटू प्रतिक गरवारे यांनी दिली.
आठ वर्षांची परंपरा; साहस आणि संघभावनेचा संगम…
टीम बाइकपोर्ट गेल्या आठ वर्षांपासून देशातील विविध ठिकाणी वार्षिक सायकल मोहिमांचे आयोजन करत आहे. गोवा, हैदराबाद, दिल्ली, कूर्ग आणि ऊटी यांसारख्या विविध ठिकाणांचा सायकल प्रवास अनुभवलेल्या या टीमने यंदा दांडेलीच्या दिशेने साहसी मोहीम आखली आहे. दरवर्षी एक सामाजिक संदेश घेत हे सायकलवीर देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतात.
१९ सायकलिस्टचा सहभाग असलेली ही मोहीम केवळ अंतर पार करण्यापुरती मर्यादित नसून, पाणी संवर्धनाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, पर्यावरणाप्रती सामाजिक बांधिलकी जपणे आणि सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
## 🚴♂️ टीम बाइकपोर्टच्या सायकल मोहिमेतील १९ सायकलस्वार…
१.डॉ. रहनुमा एहतशामुद्दीन,वय : ४३ वर्षे,व्यवसाय : रुग्णालय प्रशासक
२. गिरीश राव, वय : ५६ वर्षे, व्यवसाय : रेल्वे अधिकारी
३. योगेश गायधनी, वय : ५० वर्षे,व्यवसाय : गुरुजी व पुजारी, कल्याण
४. अमित अरुण मोरे, वय : ४६ वर्षे,व्यवसाय : व्यावसायिक
५. राघवेंद्र राव,वय : ४४ वर्षे, व्यवसाय : वकील
६. किरण शेट्टी,वय : ४८ वर्षे, व्यवसाय : वरिष्ठ आयटी व्यवस्थापक
७. जगजीवन सिंग,वय : ३७ वर्षे, व्यवसाय : उद्योजक
८. अनुप रॉय, वय : ३२ वर्षे, व्यवसाय : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र
९. प्रतीक गरवारे,वय : ४० वर्षे,व्यवसाय : वरिष्ठ आयटी व्यावसायिक
१०. आनंद जाधव, वय : ५८ वर्षे,व्यवसाय : अभिनेते व दिग्दर्शक
११. संजय मोटवानी,वय : ५० वर्षे,व्यवसाय : आयटी सेवा (इन्फ्रास्ट्रक्चर)
१२. रमेश पलाटी,वय : ३९ वर्षे, पद : वरिष्ठ अधीक्षक, भारतीय नौदल
१३. सारंग दळवी, वय : ३७ वर्षे, व्यवसाय : स्ट्रायकर डिटेलर्स एलएलपीचे व्यावसायिक
१४. साहिर शेख,वय : ४२ वर्षे, व्यवसाय : व्यावसायिक, बाइकपोर्ट सायकलिंग स्टोअर
१५.सी. के. साबळे,वय : ६६ वर्षे,व्यवसाय : वकील
१६. मिलिंद देशमुख,वय : ५३ वर्षे, व्यवसाय : शिपिंग व लॉजिस्टिक्स क्षेत्र
१७. मधू गोपाल कोणार,वय : २६ वर्षे, व्यवसाय : व्यावसायिक
१८. प्रीतेश शिंदे, वय : ३३ वर्षे,व्यवसाय : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र
१९. नानासाहेब शिरसाट, वय : ४२ वर्षे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी

