Home ठळक बातम्या पंतप्रधानांचा कल्याण दौरा : डम्पिंग ग्राऊंडवर 24 तास सुरक्षारक्षक तैनात; फवारणीही सुरू

पंतप्रधानांचा कल्याण दौरा : डम्पिंग ग्राऊंडवर 24 तास सुरक्षारक्षक तैनात; फवारणीही सुरू

कल्याण दि.15 डिसेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्यापूर्वी कल्याण शहरात अनेकविध बदल घडताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीचा अतिशय कळीचा मुद्दा बनलेल्या आणि दिवसागणिक उग्र प्रश्न बनत चाललेल्या डम्पिंगमूळे महापालिकेचे नाक कापले जाऊ नये यासाठी महापालिकेने विशेष लक्ष दिलेले दिसत आहे. कारण मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी 24 तास सुरक्षारक्षक तैनात करण्यासह वास येऊ नये म्हणून केमिकल फवारणी केली जात आहे.

 

गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आणि त्यातले सत्ताधारी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखवत असले तरी अद्याप त्याला म्हणावं तितकं यश आलेले नाही. आणि आता तर देशातील सर्वोच्च व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात येत आहेत. निदान त्यांच्यासमोर तरी महापालिकेची या मुद्द्यामुळे बेइज्जती होऊ नये यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच फडके मैदानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी डम्पिंगवरील कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली होती.

हा प्रकार पंतप्रधानांसमोर घडू नये यासाठी महापालिकेने डम्पिंगवर 24 तास 30 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडच्या चारही दिशेला हे सुरक्षारक्षक खडा पहारा देत आहेत. यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून डम्पिंगवर सतत केमिकल फवारणीही सुरू आहे. तर आग लागल्यास खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील असणाऱ्या एसटीपी प्रकल्पातून पाण्याची मोठी लाईनही वरपर्यंत नेण्यात आले आहे.

डम्पिंगबाबत महापालिकेने केलेल्या या उपाययोजनांचे स्वागत केले असले तरी याआधी ते का केले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान येणार म्हणून या उपाय योजना न राबवता कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*