Home Uncategorised समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पाहतोय – कवियत्री नीरजा यांची खंत

समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पाहतोय – कवियत्री नीरजा यांची खंत

कल्याण दि.20 जानेवारी :
आपल्या समाजाने आणि देशाने असहिष्णू प्रतिमा आता दुरुस्त केली पाहीजे. कारण समाज व्यवस्थेपेक्षा धर्म व्यवस्थेचा पगडा वाढू पाहतोय अशी खंत सुप्रसिद्ध कवियत्री नीरजा यांनी कल्याणात बोलताना व्यक्त केली. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याण सार्वजनिक वाचनालायतर्फे आयोजित 44 व्या महानगर मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नीरजा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी संमलेनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीवर बोलताना ही खंत व्यक्त केली. तसेच यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याबद्दल नीरजा यांनी निषेधही नोंदवला.

आताचा काळ हा लेखक, कवी यासारख्या संवेदनशील व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. केवळ महानगरातच नव्हे तर ग्रामीण भागातही ही अस्वस्थता आपल्याला दिसत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण गढूळ होत असताना लेखक आणि कवी यांनी बोलले पाहिजे असे नीरजा यावेळी म्हणाल्या.

तर आपला देश नेहमी सर्व जाती धर्माना एकत्र घेऊन राहिलेला देश असून वेगळ्या संस्कृती आणि वेगळी माणसं एकजीव होऊन सुखाने नांदत आहेत. अशावेळी समाजातील काही ठराविक लोक मात्र आपण विसरू पाहत असणाऱ्या जाती-धर्माची सतत आठवण करून देत आहेत. ते थांबल्यास माणसातील दुरावा आपोआप दूर होईल आणि आपला देश कुठच्या कुठे पुढे निघून जाईल. देशाची प्रगती केवळ आर्थिक सत्तेतून होत नसते तर सामाजिक आणि सांस्कृतिक मोलही तितकेच असले पाहिजे असेही नीरजा यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ राजकीय, सामाजिक नाहीये तर आपल्या घरापासून कुटुंबापासून सुरुवात होते. त्याची मुळे बाहेर समाजात रुजायला लागतात आणि नंतर संपूर्ण देश व्यापला जातो. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याच्या मनात अनेक गोष्टी असतील पण बोलता येत नाहीत. सत्तेच्या बाबतीत वरच्या व्यक्तीने खालील पदावरील माणसानी बोलायचे नाही हें ठासून सांगितलेले आहे. या सत्तेमध्ये सगळीकडे अभिव्यक्तीचा संकोच केला जात असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाला महापौर विनिता राणे, स्वागताध्यक्ष रवी पाटील, अभिनेते विघ्नेश जोशी, मराठी साहित्य संघ अध्यक्ष रा.क.भालेराव, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, कवियत्री उषा तांबे, मुंबई मराठी साहित्य संघ कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, साहित्यिक जितेंद्र भामरे, सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोशी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*