Home ठळक बातम्या खिडकाळी शिवमंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटीचा निधी; तिर्थक्षेत्राच्या दर्जासाठीही प्रयत्न

खिडकाळी शिवमंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटीचा निधी; तिर्थक्षेत्राच्या दर्जासाठीही प्रयत्न

डोंबिवली दि.13 नोव्हेंबर :
कल्याण -शिळ मार्गावर असणाऱ्या खिडकाळी शिवमंदिर आणि परिसराचे सुशोभिकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या मंदिराला तीर्थक्षेत्राच्या दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या शिवमंदिर परिसरात झालेल्या मंदिराचे विश्वस्त, स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील आणि ग्रामस्थांसह झालेल्या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी ही माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यात स्वयंभू शिवलिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये अंबरनाथचे शिवमंदिर आणि देसाई गावाजवळील खिडकाळी शिवमंदिराचा उल्लेख सापडतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ येथील  प्राचीन शिवमंदिर आणि परिसराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४३ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आणि देशातील अग्रगण्य आरेखकांच्या मदतीने या शिवमंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. अंबरनाथमधील या शिवमंदिरानंतर खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिराची ओळख आहे. खिडकाळी येथील शिवलिंग स्वयंभू असून त्याच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत वास्तव्यास येतात. तर स्वामी शिवानंद महाराज यांनी १९३४ मध्ये येथे समाधी घेतली आहे.

या शिवमंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यटनसंबंधी विविध योजनांमार्फत या मंदीराचा तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल आणि भविष्यात एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल. यासाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून नगरविकास विभागातर्फे खिडकाळी शिवमंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी  मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे खिडकाळी येथील शिवमंदिर आणि परिसराचे रूपडे पालटणार असल्याचा विश्वास यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा