Home ठळक बातम्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह 5 जणांचा सांडपाणी मिश्रित विहीरीत बुडून मृत्यू

अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह 5 जणांचा सांडपाणी मिश्रित विहीरीत बुडून मृत्यू

कल्याण दि.1 नोव्हेंबर :
डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतही काहीसा असाच भयानक प्रकार घडला आहे. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तीही बुडाल्या. तर त्यांना वाचवण्यासाठी या विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे 2 कर्मचारीही बुडाल्याने खळबळ उडाली आहे. दुर्दैवाने या पाचही जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या भिमाशंकर मंदिराजवळ ही विहीर आहे. या विहिरीच्या सफाईसाठी कमलेश यादव  स्थानिक इसम उतरला होता. तो बराच वेळ होऊनही वर न आल्याने तिकडच्या परिसरातील राहुल गोस्वामी हा विहिरीत उतरला. मात्र सफाई कर्मचाऱ्यापाठोपाठ तोही बाहेर न आल्याने त्याचे वडील गुणवंत गोस्वामी हेदेखील विहिरीत उतरले आणि तेपण विहिरीत बेपत्ता झाले. तोपर्यंत या घटनेची माहिती महापालिका अग्निशमन दलाला मिळाल्याने अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
त्यातील एक अग्निशमन कर्मचारी विहिरीत उतरत असताना भयंकर विषारी गॅसमुले त्याला चक्कर आली आणि तो खाली विहिरीत पडला. तो पडत असताना पाहून अग्निशमन दलाच्या आणखी एका कर्मचारी धाव घेत विहिरीत उतरला. मात्र त्याला बाहेर काढत असताना तोही विहिरीतील विषारी वायूमुळे आतमध्ये पडला. बराच वेळ होऊनही त्यापैकी एकही जण वर न आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखून अग्निशमन दलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. परंतु पाच जणांपैकी एकालाही वाचवण्यात यश आले नाही. अनंत शेलार आणि प्रमोद वाकचौरे अशी या दोघा अग्निशमन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

 

दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून घटनेप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

या घटनेची तातडीने चौकशी करून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल… महापालिका अधिकाऱ्याचा त्यात दोष आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगणार…यासंदर्भात स्थानिक नगरसेवक नविन गवळी यांनी वारंवार प्रशासनाला याबाबत माहिती दिली होती…

 

पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करणार – प्रताप दिघावकर, अपर पोलीस आयुक्त…

घडलेली घटना दुर्दैवी असून पोस्टमार्टम रिपोर्ट आणि चौकशी करून याप्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल करू अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघागावकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*