Site icon LNN

अभिमानास्पद क्षण; कल्याणच्या कृष्णाक्षी देशमुखची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

कल्याणच्या एलिट स्पोर्टिंग अकादमीतून कृष्णाक्षी घेतेय प्रशिक्षण

कल्याण दि.23 नोव्हेंबर :
कल्याणातील क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने एक मोठा आणि तितकाच अभिमानास्पद क्षण घडला आहे. युवा फुटबॉलपटू कृष्णाक्षी देशमुख हिची ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. कृष्णाक्षी ही नामांकित फुटबॉल अकादमी अशी ओळख असलेल्या एलीट स्पोर्टिंग अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक आणि माजी राष्ट्रीय खेळाडू लेस्टर पीटर्स यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. (A Proud Moment: Kalyan’s Krishnakshi Deshmukh Selected for Maharashtra Team in the National Football Championship)

आजपासून सुरू दरम्यान नागालँड येथे ही डॉ. तालीमेरेन आव ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. ज्यामध्ये देशभरातील विविध राज्यांचे फुटबॉल खेळाडू सहभागी होणार आहेत. तर देशातील फुटबॉल क्षेत्रामध्ये या राष्ट्रीय स्पर्धेला वेगळाच मान असून या स्पर्धेमध्ये एकदा तरी आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करावे अशी प्रत्येक युवा फुटबॉल खेळाडूची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या कृष्णाक्षी देशमुखची झालेली ही निवड कल्याण-डोंबिवली परिसरासाठी मोठा सन्मान समजला जात आहे.

कृष्णाक्षीने आपल्या फुटबॉल प्रवासाची सुरुवात 2021 मध्ये केली. एलिट स्पोर्टिंग अकॅडमीच्या नियोजनबद्ध आणि कौशल्यवर्धक प्रशिक्षण पद्धतीतून दिवसागणिक तिच्या खेळामध्ये सातत्याने सुधारणा होत गेली. तिची शिस्त, जिद्द आणि प्रगतीची धडपड यामुळेच तिला राज्यस्तरीय संघात स्थान मिळवता आल्याची भावना एलिट स्पोर्टिंग अकॅडमीतर्फे व्यक्त करण्यात आला.

कृष्णाक्षीचे वडील व्यंकटेश देशमुख हे व्यावसायिक अभियंता असून आई सोनाली देशमुख या गृहिणी आहेत. त्यांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच कृष्णाक्षीने आपल्या खेळातील प्रगतीचे शिखर गाठल्याचे अकॅडमीने सांगितले. तर एलाइट स्पोर्टिंग अकॅडमीने कृष्णाक्षीच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत तिला या आगामी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

कृष्णाक्षीच्या या निवडीनंतर स्थानिक पातळीवरील गुणी खेळाडू हेरण्याची आणि त्यांना चांगला खेळाडू म्हणून घडवण्याची वचनबद्धता एलिट स्पोर्टिंग अकॅडमीने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Exit mobile version