Home Uncategorised रोटरीच्या भन्नाट ‘एअरोमोडेलिंग शो’ वर कल्याणकर फुल्ल फिदा

रोटरीच्या भन्नाट ‘एअरोमोडेलिंग शो’ वर कल्याणकर फुल्ल फिदा

कल्याण दि.18 नोव्हेंबर :
रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं, डोळ्यांचे पारणे फेडणारी अदाकारी आणि एकाहून एक सरस अशा स्टंट्सचा कल्याणकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेतल्याचे आज पाहायला मिळाले. निमित्त होते सेवा सप्ताहानिमित्त कल्याण रोटरी क्लबने आयोजित केलेल्या ‘एआरोमोडेलिंग शो’चे. येथील बिर्ला कॉलेज मैदानावर पार पडलेल्या या अनोख्या सोहळ्याला कल्याणकरांनी गर्दी केली नसती तर नवलच.

एआरोमोडेलिंगच्या क्षेत्रातील केवळ देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जहागिरदार कुटुंबियांतर्फे ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यश जहागिरदार यांनी रिमोट कंट्रोलद्वारे आपल्या हातांच्या बोटांवर या विमानांची इतकी अप्रतिम अदाकारी सादर केली की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क होऊन गेलेले पाहायला मिळाले. नॉर्मल स्पिन, व्हर्टिकल स्पिन, टच अँड गो असे ‘एआरोमोडेलिंग शो’मधील एकसे बढकर एक प्रकार त्यांनी विमानांद्वारे करून दाखवले. जे पाहताना उपस्थित श्रोतेवर्गाचे श्वास रोखले गेले होते. सायलेंट ट्रेनर विमान उडवण्यापासून सुरूवात झाल्यानंतर ग्लायडर, बलसावूड नावाच्या लाकडापासून बनवलेले विमान, फायटर प्लेन, मिनी सॅटर्न, फ्लाईंग सोसर (उडती तबकडी) आणि नंतर 8 फूट लांबीच्या भल्यामोठ्या लाकडी विमानाने सर्वानाच एका जागी खिळवून ठेवले. इलेक्ट्रीक मोटर, पेट्रोल आणि कॅस्टर ऑइल आदी इंधनांद्वारे उडणारी 9 प्रकारची विमानांची यश जहागिरदार यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. कल्याणच्या विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

लहान मुलांमध्ये एव्हीएशन आणि एआरोमोडेलिंगबद्दल आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कल्याण रोटरी क्लब अध्यक्ष याकूब भेतासीवाला यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. शिवराज, बिर्ला कॉलेज प्राचार्य नरेशचंद्र यांच्यासह रोटरीचे मिलिंद कुलकर्णी, मदन शंकलेशा, चिंतन ठक्कर, रोनक तन्ना आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*