Home ठळक बातम्या सार्वजनिक आणि एकांतातील गप्पा संपल्याने माणसंही गप्प झाली – सुसंवादिका धनश्री लेले

सार्वजनिक आणि एकांतातील गप्पा संपल्याने माणसंही गप्प झाली – सुसंवादिका धनश्री लेले

 

भाषेची श्रीमंती जपण्यासाठी विस्मरणात जाणारे शब्द वापरण्याची गरज

डोंबिवली दि.26 फेब्रुवारी :
संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुधीर मोघे अशा असंख्य भाषाप्रेमींनी भाषेला बरंच काही दिलं. पण काळाच्या ओघात आपल्याकडून अनेक शब्दांचा वापर कमी झाला. परिणामी शब्द मागे पडून घरंगळून गेले. जातं सरलं तिथे ओवी सरली, सार्वजनिक ठिकाणच्या गप्पा, एकांतातल्या मनाशी गप्पा संपल्या आणि माणसंही गप्प झाली असे निरिक्षण सुप्रसिद्ध सुसंवादिका आणि लेखिका धनश्री लेले यांनी नोंदवले. डोंबिवलीतील के.बी. विरा शाळेच्या पटांगणात आयोजित ग्रंथोत्सवात शब्दमोती या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शब्दमोती कार्यक्रम…

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा, डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फेब्रुवारीपासून डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माळेत शुक्रवारी सुप्रसिद्ध सुसंवादिक आणि लेखिका धनश्री लेले यांनी तिसरी सांस्कृतिक माळ गुंफली. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शब्दमोती कार्यक्रमातून शब्दांचा जन्म, त्याची महती, त्याचे नातेवाईक, साहित्य आणि वाङमयातील त्याचा वापर त्यांनी आपले गायक सहकारी नेहा पुरोहित आणि अनुराग नाईक यांच्या संगीतविरहीत गाण्यातून उलगडून सांगिलता.

विस्मरणात जाणारे शब्द शोधून ते योग्य ठिकाणी वापरात आणा…

बदलत्या जीवनशैलीत अनेक वस्तू कालबाह्य होऊन अडगळीत पडतात, मग त्याच्याशी संबंधित असलेले शब्दही मागे पडून घरंगळून जातात. भाषेची श्रीमंती जपायची असेल तर विस्मरणात जात असलेले शब्द शोधून ते योग्य ठिकाणी वापरात आणायला हवेत असे प्रतिपादन लेले यांनी यावेळी केले. संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, शांता शेळके, सुधीर मोघे आदी भाषाप्रभूंच्या रचनांचे उदाहरणासहित दाखले देत त्यांनी मराठी भाषेच्या अभिजात श्रीमंतीची ओळख रसिकांना करून दिली.

शब्दांमागचा गर्भीतार्थ उलगडून सांगितला…

संत ज्ञानेश्वरांच्या ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ या काव्यापासून या कार्यक्रमाची सुरेल सुरूवात झाली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यात वापरलेले शब्द फक्त त्याचा अर्थच सांगत नाही तर एक विचारही सांगतात हे त्यांनी पुराव्यांसह दाखवून दिले. ‘मन मनास उमगत नाही’, ‘वेगवेगळी फुले उमलली’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘सांज ये गोकुळी’ अशा अनेक गाण्यांतून त्यांनी शब्दांमागचा गर्भीतार्थ उलगडून सांगितला.

गप्पा बंद झाल्या आणि माणसंही गप्प झाली…

साहित्य आणि वाङमयातील फरकाची त्यांनी यावेळी उकल केली. वाचेवरून वाचेवर फिरणाऱ्या ओव्या हेच खरे वाङमय आहे. मौखिक परंपरेने जे जपले जाते ते वाङमय. आपल्याकडे स्त्रियांनी जात्यावर दळण दळताना स्वसंवाद साधत ओवी परंपरा जपली. जात्याचा वापर बंद झाल्यानंतर ओव्या विस्मरणात गेल्या. सार्वजनिक ठिकाणी पाणवठ्यावर, जात्यावर होणाऱ्या गप्पांमधून शब्दांना उजाळा दिला जात होता. अनेक शब्दांचा वापर केला जात होता. त्यामुळे ते शब्द टिकून होते. मात्र या गप्पा बंद झाल्या आणि माणसं गप्प झाली असेही धनश्री लेले यावेळी म्हणाल्या.

पुढील पिढीला मराठी भाषेच्या श्रीमंतीची ओळख करून देणे आपली जबाबदारी…

अन्योन्य, बिलोरी, झेला, आंधण, विसावण, मुसळ, लंगडी आदी अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्दांची ओळख त्यांनी करून दिली. पुढील पिढीला मराठी भाषेच्या श्रीमंतीची ओळख करून देणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी आधी आपण नेमकेपणाने मराठी भाषा वापरायला हवी असेही त्या म्हणाल्या. भाषेला कोणत्याही धर्माच्या चौकटीत बसवण्याची गरज नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेला 45 नवे शब्द दिले. त्याचवेळी त्यांनी आपली गझल उर्दू भाषेतून लिहीली हेही त्यांनी आवर्जून सांगितले. सुमारे दीड तास रंगलेल्या या कार्यक्रमाला डोंबिवलीकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा