Home ठळक बातम्या एकवटलेल्या आगरी कोळी समाजाचा कौल कल्याण-भिवंडी लोकसभेत ठरणार निर्णायक*

एकवटलेल्या आगरी कोळी समाजाचा कौल कल्याण-भिवंडी लोकसभेत ठरणार निर्णायक*

 

*केतन बेटावदकर*

कल्याण दि.14 मार्च :
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करायचे याचे आराखडे बांधत असताना ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र अशी ओळख असणारा ‘आगरी कोळी समाज’ आपापसातील मतभेद विसरून एक झाला आहे. आगरी समाजाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात आगरी कोळी समाजाचा वरचष्मा पाहता त्यांचा ‘कौल’ निर्णयाक ठरेल असे चित्र सद्यस्थितीवरून दिसत आहे.

आगरी समाज मुंबईच्या अगदी सुरुवातीच्या रहिवाशांपैकी एक असल्याचे दाखले आहेत. मुळात आगरी हा शब्दच आगार म्हणजे ‘मिठाचे आगार’ किंवा ‘शेताचे आगार’ ह्यावरून आला आहे.  मुंबईचे प्रवेशद्वार अशी ओळख असणारा ठाणे आणि कोकणचे प्रवेशद्वारे असणारा रायगड जिल्हा हा आगरी कोळी समाजबहुल म्हणून ओळखला जातो. मुंबई आणि ठाण्याचा आज चारी दिशेला झालेला विस्तार आणि विकास बघितला तर त्यामध्ये आगरी कोळी समाजाचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. या आगरी कोळी समाजाच्या बहुतांश जमिनींवर तर आज मुंबई, ठाण्यामध्ये विकासाचे इमले उभे राहिले आहेत. शेतीबरोबरच मासेमारी करणारा हा आगरी कोळी बांधव समाजकारणाच्या माध्यमातून आता राजकारणातही स्थिरावत आहे.

मग तो काँग्रेस पक्ष असो शेतकरी कामगार पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस मनसे असो की सध्या सत्तेत असणारा शिवसेना भाजप. या सर्वच पक्षांत आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधित्व दिसून येते. विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विचार केला असता सर्वच प्रमूख राजकीय पक्षांमध्ये त्यांचे प्राबल्य दिसून येईल. सुमारे दोन वर्षांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नेवाळी गावात भूसंपादनप्रश्नी झालेल्या उग्र आंदोलनानंतर विखुरलेला हा आगरी कोळी समाज एकत्र आला.

एकमेकांतील राजकीय स्पर्धा आणि आपापसातील मतभेद बाजूला सारत आज आगरी कोळी समाज एकवटलेला दिसतोय. समाजातील मान्यवर व्यक्तींचा पुढाकार आणि तरुण वर्गाने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नेवाळीच्या घटनेनंतर हा आगरी कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी आणखीनच आक्रमक झालेला दिसतोय. मग तो 27 गावांचा प्रश्न असो की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी भूसंपादनाचा विषय असो. किंवा लहान सहान सामाजिक विषयांसाठीदेखील आगरी कोळी समाज एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय.

या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत आगरी कोळी समाजाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर या समाजाची वस्ती आहे. तसेच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आगरी कोळी समाज आघाडीवर आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहतो, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला कौल देतो आणि विशेष म्हणजे एकवटलेल्या या समाजाचे प्रतिबिंब मतदानामध्येदेखील उमटणार का? आदी महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं हीच लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा आणि त्याच्या पुढील वर्षी होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची दिशा ठरवतील हे निश्चित.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*