महाविद्यालयातील तरुण – तरुणींनी व्यक्त केला तीव्र संताप
कल्याण दि.22 ऑगस्ट :
आधी कोलकत्ता आणि मग आता बदलापूर येथील महिलांवरील अत्याचारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाजातील प्रत्येक जण आपापल्या परीने या घटनांचा तीव्र निषेध करत असून कल्याणातील के.एम. अग्रवाल महाविद्यालयातही या घटनांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये महाविद्यालयातील शेकडो तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोलकत्ता आणि बदलापूर येथील घटनांनंतर समाजामध्ये एक संतापाची लाट उसळली आहे. ज्याची प्रचिती दोन दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये झालेल्या जन आंदोलनानंतर आली आहे. तर के.एम. अग्रवाल महाविद्यालयातील वूमन डेव्हलपमेंट सेलकडूनही या घटनांचा निषेध करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सध्याच्या सामाजिक परिस्थितीची माहिती करून देण्यासोबतच त्यांच्यामध्ये या विकृत घटनांबाबत जागृती करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमिता मन्ना यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तर या स्वाक्षरी मोहिमेमध्ये महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या घटनांविरोधतील आपला निषेध नोंदविला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमिता मन्ना, डॉ. अनघा राणे, डॉ. जयश्री शुक्ला, डॉ. सुमन त्रिपाठी, मीनल सोहनी डॉ. वैशाली पाटील, अक्षता बारी यांच्यासह अनेक प्राध्यापक – प्राध्यापिकाही उपस्थित होते.