Home ठळक बातम्या पत्रीपुलाच्या रखडपट्टीमूळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

पत्रीपुलाच्या रखडपट्टीमूळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

कल्याण दि.31 जानेवारी :
कल्याण पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाच्या रखडलेल्या कामामुळे एकीकडे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त झाले असतानाच स्थानिक व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धोकादायक बनल्याने जुना पत्रीपुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर 3 महिन्यांनी हा जुना पूल जमीनदोस्त करण्यात आला. तर बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 30 डिसेंबरला 2018 ला नविन पत्रीपुलाच्या कामाचे मोठ्या थाटात भूमीपूजनही करण्यात आले. त्यामूळे नव्या पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी आशा नागरिक, वाहन चालक, स्थानिक व्यावसायिकांच्या मनात निर्माण झाली. मात्र मध्येच कुठे माशी शिंकली आणि भूमिपूजन होऊन एक महिना उलटला तरीही हे काम ‘जैसे थे’ स्थितीत आहे.

जसजसे दिवस, आठवडे, महिने उलटत आहेत तसतसे पत्रीपुल परिसरातील व्यापारी, रहिवासी यांची चिंता अधिकच वाढत आहे. पत्रीपुलाच्या कामाने होणारी प्रचंड वाहतूक कोंडी व्यावसायिकांच्या मुळावर उठली आहे. पत्रीपुल परिसरात असणाऱ्या स्थानिक दुकानदारांसह मेट्रो मॉलमधील व्यावसायिक सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसले आहेत. वाहतूक कोंडी लक्षात घेता याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत सुमारे मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

तर या मॉलमध्ये असणाऱ्या बॉलरूम पलाझो या मंगलकार्य सभागृहाची आणखीन बिकट अवस्था आहे. वाहतूक कोंडीमूळे याठिकाणी विचारपूस करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही सध्या नगण्य झाली आहे. तर आगामी काळात विवाहासाठी बुक करण्यात आलेल्या 10 जणांनी वाहतूक कोंडीमुळे बुकिंग रद्द केल्याची धक्कादायक माहिती हॉलचे व्यवस्थापक ललित तर्टे यांनी दिली. तसेच अशीच परिस्थिती कायम राहिल्यास अमच्यासह इथल्या अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भितीही तर्टे यांनी व्यक्त केली आहे.

एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता पत्रीपुलाच्या या समस्येतून स्थानिक रहिवासी, वाहन चालक आणि व्यापारी यांची सुटका करण्यासाठी कोणीच वाली उरला नाही का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*