अजित दादांचे विचार जनमानसात पोहोचवणे हीच खरी श्रद्धांजली – माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे
कल्याण दि.2 फेब्रुवारी :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अजित दादांचे विचार जनमानसात पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत यावेळी माजी जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी व्यक्त केले. (All-Party Condolence Meet in Kalyan Pays Tribute to Ajit Dada)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अभ्यासू लोकनेते अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कल्याण शहरात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडील चिकणघर येथील मंगेशी बँकवेट सभागृहात हा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला.
एखाद्या नेत्याच्या अंत्यविधीला जमणाऱ्या जनसमुदायावरून त्याच्या कार्याची महती कळते. अजित दादांनी बारामतीमध्ये उभारलेला आदर्श विकास मॉडेल आज प्रत्येक प्रभाग, तालुका आणि जिल्ह्यात राबवणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दांत जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर अजित दादा म्हणजे कामाचा माणूस. प्रत्येक सामान्य माणसाची तक्रार ऐकून ती मार्गी लावण्याची त्यांची वेगळी कार्यपद्धती होती. गोरगरीबांचा कैवारी म्हणून ते ओळखले जात होते. स्वच्छता, शेती, प्रशासन यावर त्यांचा विशेष भर असायचा. अशा व्यक्तीचे जाणे हे केवळ आपल्यासाठीच नाही तर राष्ट्रवादी पक्ष आणि उभ्या महाराष्ट्राची मोठी हानी असल्याची भावना राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मांडली. तसेच अजित दादा यांच्यासोबतच्या चार दशकांतील अनेक जुन्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.
या श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, दैनिक ‘जनमत’चे संपादक तुषार राजे, ‘प्रजाराज’चे संपादक विष्णुकुमार चौधरी, भाजप नगरसेवक वरुण पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, उबाठाचे शहराध्यक्ष बाळा परब, आम आदमी पक्षाचे शैलेश जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप जगताप यांनी केले.

