Site icon LNN

83 पेक्षा जास्त जागा आणि 5 वर्षे महापौरपद द्या, तरच युती शक्य – भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार

समाधानकारक तोडगा निघाला नाही तर एकमेकांची ताकद आजमावण्याचे आव्हान

कल्याण डोंबिवली दि.26 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये एकट्या भाजपला 80 हून जागा मिळणार असल्याचे दिसत असून आम्हाला 83 हून अधिक जागा मिळाल्या तरच आम्ही युतीसाठी तयार आहोत, अन्यथा युती होणार नाही अशा शब्दांत माजी आमदार आणि महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य नरेंद्र पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना पवार यांनी भाजपाच्या मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत एकप्रकारे दंड थोपटले आहेत. (Alliance Possible Only if Given More Than 83 Seats and the Mayor’s Post for 5 Years – BJP Former MLA Narendra Pawar)

भाजपची ताकद कल्याण डोंबिवलीमध्ये वाढली आहे…
निवडणुका होऊन आता 10 वर्षे झाली आहेत, आमचे असो की त्यांचे सगळेच नगरसेवक माजी झाले असून अपवाद वगळता कोणालाही प्रभागात ओळखणार नाही अशी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती पाहता शून्यातून सुरूवात करणे आवश्यक असून या 10 वर्षांत राजकीय गणिते मोठ्या प्रमाणावर बदलली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच याआधीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले तेव्हा शिवसेना एकत्र होती. मात्र आता शिवसेनेचे दोन भाग झाले असून भाजप एकसंघच आहे. आणि या 5 वर्षांत भाजपची ताकद कल्याण डोंबिवलीमध्ये वाढलेली असल्याचे सांगत शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला मान्य नसून भाजपने मांडलेला फॉर्मुला हा प्रॅक्टिकल असल्याचे ते म्हणाले.

आम्ही दिलेल्या अटींवरच युती होईल…
भाजपने केलेल्या सर्वे मध्ये 80 पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळत असल्याने 83 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. तर गेल्यावेळी आमच्या हक्काचे महापौरपद आम्हाला मिळाले नाही, सभागृह नेताही शिवसेनेचाच राहिला आणि आम्हाला उपमहापौरपद देण्यात आले होते. परंतु आता त्या पद्धतीने चालणार नसून आम्ही दिलेल्या अटींवरच युती होईल अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली.

स्थानिक पातळीवर युतीसाठी सकारात्मक भूमिका नाही…
तर युती होऊ नये ही आमच्या पक्षाप्रमाणे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. या निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढणे आमच्याप्रमाणे शिवसेनेलाही सोपे नाहीये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युतीसंदर्भातील निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे जाहीर केले असून स्थानिक पातळीवर युतीसाठी सकारात्मक भूमिका नसल्याने युतीच्या नेत्यांनी त्याचा आदर केला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

एकंदर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मांडलेल्या या परखड भूमिकेनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीबाबत काहीही आलबेल नाहीये हे स्पष्ट आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूरमधील निवडणूक निकालानंतर भाजपही अधिक आक्रमकपणे भूमिका मांडत असल्याचे दिसून येत आहे. त्याला आता शिवसेनेचे नेतृत्व काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.

Exit mobile version