Home ठळक बातम्या महत्वाकांक्षी ‘रिंगरोड प्रकल्प’ येत्या वर्षभरात पूर्ण होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

महत्वाकांक्षी ‘रिंगरोड प्रकल्प’ येत्या वर्षभरात पूर्ण होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा कामाची पाहणी

कल्याण दि.4 जून :
कल्याण डोंबिवली शहरांची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा रिंगरोड येत्या वर्षभरात वाहतुकीसाठी सुरू होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या कल्याणातील दुर्गाडी ते टिटवाळा या टप्पा क्रमांक 4 ते 7 ची आज खासदार डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए आणि केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. (Ambitious ‘Ring Road Project’ to be completed in the coming year – MP Dr. Shrikant Shinde)

कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी सुटण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या रिंगरोड प्रकल्पाचे काम गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू आहे. 1 ते 7 अशा विविध टप्प्यात सुरू असणाऱ्या या कामाला गेल्या वर्षभरात मात्र चांगलीच गती आलेली दिसत आहे. हा रिंगरोड पूर्ण झाल्यावर कल्याण ते टिटवाळा हे अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. तर या प्रकल्पातील अंतिम टप्पा ज्याठिकाणी संपतो त्याच्या पुढील रस्त्याचा 8 व्या टप्प्यांर्तगत विस्तार करण्याच्या सूचना दिल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर टप्पा क्रमांक 3 ते 8 मूळे कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी होणार आहे. गेल्या 5 – 6 वर्षांत कल्याण डोंबिवलीत वाहतुकीचा प्रश्न जटील झाला होता. कल्याण डोंबिवलीमध्ये प्रवेश करणारे रस्ते बॉटलनेक झाल्याने आणखीनच त्रासात भर पडली होती. मात्र आता पत्रीपुलाचे काम पूर्ण झालं आहे, दुर्गाडीचे, कल्याण शिळ रोडसहा पदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून आता रिंगरोडही येत्या वर्षभरात पूर्ण होतोय. त्याचजोडीला काटई ते ऐरोली भुयारी मार्गाचा मेगाप्रोजेक्टही काम सुरू असून पूढील 1 ते 2 वर्षांत कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने इथली वाहतूक कोंडीची बहुतांशी समस्या संपुष्टात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान रिंगरोड प्रकल्पातील 4 ते 7 टप्प्याचे काम अत्यंत वेगाने पूर्ण केल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आणि टिमचे कौतुक केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे जयवंत ढाणे, शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील, माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा