Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरातील इमारतीत बिबट्या शिरल्याने दहशतीचे वातावरण

कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरातील इमारतीत बिबट्या शिरल्याने दहशतीचे वातावरण

 

कल्याण दि. 24 नोव्हेंबर :
कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी आजची सकाळ चांगलीच तापदायक ठरली आहे. कल्याण पूर्वेतील चिंच पाडा परिसरात एका इमारतीमध्ये चक्क बिबट्या शिरल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर मध्यरात्रीच्या सुमारासच हा बिबट्या कल्याण पूर्वेत आला असून दोघा नागरिकांवर त्याने हल्ला केल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमनिवली चिंचपाडा परिसरात अनुराग ही इमारत असून त्याच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या शिरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही वर्षांपूर्वी उल्हानगरमध्येही अशाच प्रकारे इमारतींमध्ये अचानक बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली होती. तर आतापर्यंत आपण मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या महानगरांमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याचे पाहिले आणि ऐकले होते. मात्र आज चक्क कल्याणात मानवी वस्तीत हा बिबट्या आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान मानवी वस्तीत बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन अधिकारी, स्थानिक पोलीस आणि केडीएमसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभगाची एक स्पेशल टीम ठाण्यावरून कल्याणकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा