Site icon LNN

सचिन पोटे समर्थकांचा काँग्रेस नेतृत्वावर संताप; नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पद्धतीचा निषेध करत सामूहिक राजीनामे

राहुल गांधींसह काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून व्यक्त केला रोष

कल्याण दि.27 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सचिन पोटे यांच्यासह अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करत आम्ही हे राजीनामा दिले असले तरी जिल्हाध्यक्ष बदलताना पाळली जाणारी परंपरा मोडण्यात आली. आणि यामुळेच असंतोष उफाळून आल्याचे सांगत सचिन पोटे समर्थकांनी काँग्रेस नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे. (Anger Among Sachin Pote Supporters Against Congress Leadership; Mass Resignations Over the Manner of New District President’s Appointment)

तसेच पारंपरिकरीत्या नवीन जिल्हाध्यक्ष हे पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांना भेटून पदभार स्वीकारतात. मात्र यावेळी तसे न करता जल्लोष करण्यात आल्याने “सचिन पोटे यांनी पक्ष सोडावा” असा संदेश देण्याचा हेतू होता का? असा सवाल पोटे समर्थकांनी उपस्थित केला आहे. याशिवाय नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राजाभाऊ पातकर यांच्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला आहे. पातकर यांनी २०१४ साली काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सचिन पोटे यांच्या विरोधात बंड करून भाजपात प्रवेश केला होता. आणि 10 वर्षे भाजपात राहून प्रचारही केला. भाजपच्या सत्ताकाळातही साधे वॉर्ड अध्यक्षपद न मिळालेल्या नेत्याला अचानक काँग्रेसमध्ये घेऊन जिल्हाध्यक्षपद देणे हा निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून भाजपाच्या सत्तेच्या काळात काँग्रेसची बाजू घट्ट राखणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी, पक्षासाठी “शून्य योगदान” असलेल्या व्यक्तीला जबाबदारी देणे अन्यायकारक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्ष ज्याप्रकारे भाजपातील नेत्यांना घेऊन मोठी पदे देत आहे, त्यामुळे “काँग्रेस भाजप होत चालली आहे का?” असा थेट सवालही या नाराज पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

हा संपूर्ण असंतोष एका पत्राद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सचिन पोटे यांच्या समर्थनार्थ पक्षातील आपल्या पदांचे राजीनामा देणाऱ्या शकील खान, लिओ मेक्कनरॉय, प्रवीण साळवे, मनिषा सर्जिने, संकेत लोके आणि हेमराज डेरे आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version