Home ठळक बातम्या लोकलचा दरवाजा अडवणाऱ्या महिला प्रवाशांविरोधात दिव्यात महिलांचा रेलरोको

लोकलचा दरवाजा अडवणाऱ्या महिला प्रवाशांविरोधात दिव्यात महिलांचा रेलरोको

डोंबिवली दि. 4 एप्रिल :
लोकलचा दरवाजा अडवून धरणाऱ्या महिला प्रवाशांविरोधात दिवा रेल्वे स्थानकात महिलांनी लोकल रोखून धरली. अवघी 10 मिनिटंच ही लोकल अडवून धरली तरी त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वेलपत्रकावर झाला आहे. आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

दिवा रेल्वे स्थानकात येणाऱ्या जलद लोकलमध्ये महिला डब्यात दरवाजा अडवून असणाऱ्या प्रवाशांमूळे इथल्या महिला प्रवाशांना डब्यात चढता येत नाही. काहीसा असाच प्रकार आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार येथे घडला.

दिवा स्थानकात सकाळी 6.56 मिनिटांनी मुंबई सीएसएमटिला जाणारी जलद लोकल आली असता, या लोकलमधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करू दिला नाही. यामुळे संतप्त झालेल्या दिव्यातील महिला प्रवाशांनी दरवाजात उभ्या असणाऱ्या महिलाना खाली खेचले आणि त्या लोकलच्या मोटरमनला सांगून त्या संतप्त महिला रेल्वे रुळावर उतरल्या. सुमारे 10 मिनिटं त्यांनी ही लोकल रोखून धरल्याने ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.

दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत संतप्त महिलांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या काही मिनिटात आंदोलक महिलांनी अडवलेल्या या लोकलचा मार्ग मोकळा करीत पुन्हा फलाटावर येत आपला पुढील प्रवास सुरू केला. तरीही लोकलच्या वेळापत्रकावर याचा व्हायचा तो परिणाम झालाच.

 

“दिवा स्थानकात सकाळी थांबणाऱ्या सर्व जलद लोकल या कर्जत, कसारा येथून सुटणाऱ्या असल्याने त्या प्रवाशांनी गच्च भरून येतात त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना या जलद गाड्यांचा काही एक फायदा झालेला नाही. दरवाजा अडवून दादागिरी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. रेल रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा दरवाजा अडवणाऱ्या व दादागिरी करणाऱ्यांवर आधी कारवाई करा. अन्यथा दिवा स्थानकात कधीही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो.

— *सौ.दिव्या मांडे* (सचिव,दिवा रेल्वे प्रवासी संघटना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*