आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामाअस्त्रामुळे उलट सुलट चर्चांना उधाण
कल्याण दि.26 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका घडामोडीची भर पडली असून काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले असले तरी या राजीनाम्यानंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. (Another Political Earthquake in Kalyan-Dombivli: District Congress President and Supporters Resign from Party Positions)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून इथले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेशाची मोठी चढाओढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवलीतील त्यांच्या इतर समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींना सादर केले आहेत.
आपल्या पदांचे हे राजीनामे देण्यामागे कोणतेही इतर राजकीय कारण नसून पक्षातील नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण राजीनामा देत असून हा नाराजीनामा नसल्याचे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले. तर आमचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते संजय दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही आपली वाटचाल सुरूच राहील. तसेच इतक्या वर्षांपासून आपण काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत. आणि यापुढेही आपली ही पक्षनिष्ठा कायम राहील असेही त्यांनी सांगितले. तर इतक्या कमी काळामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास दाखवत दिलेल्या विविध जबाबदाऱ्यांबाबत आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. तर आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर आल्या असल्या तरी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीमध्ये यांनी दिले राजीनामे…
सचिन पोटे – जिल्हाध्यक्ष
लिओ मॅकेनराय – उपाध्यक्ष
विमल ठक्कर – शहर अध्यक्ष
शकील खान – ब्लॉक अध्यक्ष
प्रविण साळवी – ब्लॉक अध्यक्ष
मनिषा सर्जिने – ब्लॉक अध्यक्ष, कल्याण पूर्व
अशोक कापडणे – ब्लॉक अध्यक्ष
सचिन भटेवरा – ब्लॉक अध्यक्ष

