(फाईल फोटो)
कल्याण दि.15 डिसेंबर :
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे हे आपल्या समर्थक व पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची प्रबळ शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यासोबतच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे काही विद्यमान नगरसेवक तसेच काही बडे राजकीय नेतेही त्यांच्या संपर्कात असून हे सगळे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्याच महिन्यात सचिन पोटे यांच्यासह अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही प्रबळ सत्ताधारी पक्षांकडून त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र यामध्ये सचिन पोटे यांनी शिवसेना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पक्षप्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, या घडामोडीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.सचिन पोटे यांच्यासह इतर नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेची ताकद आणखीनच वाढेल असे मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

