Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा; 150 फुटी तिरंग्याचे दिमाखात ‘ध्वजारोहण’

डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा; 150 फुटी तिरंग्याचे दिमाखात ‘ध्वजारोहण’

 

डोंबिवली दि. 26 जानेवारी :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीमध्ये उभारण्यात आलेल्या विक्रमी अशा 150 फुटी तिरंग्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत डोंबिवली शिवसेना शहरप्रमूख राजेश मोरे आणि भरती मोरे यांच्या संकल्पनेतून आणि केडीएमसीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या महाकाय झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक असणाऱ्या डोंबिवलीच्या शिरपेचात या राष्ट्रध्वजाच्या निमित्ताने आणखी एक तुरा रोवला गेला आहे. डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 76 आणि 77 मधील दत्तनगर चौकात हा 30 बाय 40 फुटी भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या राष्ट्रध्वजाशेजारीच देशाच्या संविधानाची प्रत सादर करतानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांचे शिल्प साकारण्यात आले आहे.
हा 150 फुटी राष्ट्रध्वज सांस्कृतिक नगरी असणाऱ्या डोंबिवलीची नविन ओळख ठरेल असा विश्वास यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या राष्ट्रध्वजासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ 2 दिवसांत आवश्यक ती परवानगी दिल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे आणि या राष्ट्रध्वजाच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त डोंबिवलीतील विविध नामांकित व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. ज्यामध्ये लष्करी अधिकारी, पोलीस, केडीएमसीतील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिल्पकार आदींचा समावेश होता. तर दिवंगत पत्रकार विकास काटदरे यांच्या कुटुंबियानाही यावेळी आर्थिक मदत देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण परिमंडळचे डीसीपी विवेक पानसरे, केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा