Home ठळक बातम्या केडीएमसीचा बायोमायनिंग प्रकल्प मंजूर करत त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन द्या

केडीएमसीचा बायोमायनिंग प्रकल्प मंजूर करत त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन द्या

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्र्यांची भेट

 

नवी दिल्ली दि. 17 डिसेंबर :
घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सादर करण्यात आलेल्या बायोमायनिंग प्रकल्पाला मंजूरी देण्यासह लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत शहर तसेच ग्रामीण भागांच्या स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सामुदायिक स्वच्छतागृहे, शाळा ,अंगणवाड्यामध्ये शौचालये , घन- द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारणे यावर भर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014ला देशव्यापी मोहीम घोषित केली होती. त्यापाठोपाठ याच उद्देशाने, महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन (शहरी)’ या अभियानाची घोषणा केली होती. प्रभावी घनकचरा व्यवस्थापनाद्वारे महाराष्ट्रातील शहरे स्वच्छ आणि सुंदर करणे हा या अभियानाचा उद्देश होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य HPC आणि MoHUA यांच्याद्वारे ३८३ शहरांचे SWM DPR मंजूर केले. महाराष्ट्राने डी-टू-डी कलेक्शन, उगमस्थानी कचऱ्याचे विलगीकरण आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात लक्षणीय प्रगती साधली आहे. परंतु प्रामुख्याने छोट्या शहरांमध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग (जैव-खनन) सारखे प्रकल्प युद्धपातळीवर उभे करण्यावर विचार करणे आवश्यक असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या भेटीदरम्यान सांगितले.

१ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा डेटा राज्य सरकारने संकलित केला आहे आणि केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील एकूण ३३ अमृत शहरांमधील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्पाचे काम प्राधान्याने हाती घेणे आवश्यक असून या ३३ शहरांसाठीच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च रु. ६९४ कोटी असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. या ३३ शहरांच्या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा देखील समावेश आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या बायोमायनिंग प्रकल्पासाठी १३७.५२ कोटी रुपये अंदाजित केले आहेत. या प्रकल्पाचे तपशीलही संबंधित शासकीय संस्थांना सादर करण्यात आला असून त्यासाठी राज्य सरकारने एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

घनकचऱ्याच्या डोंगरांमुळे जवळपासच्या परिसरातील हवा, पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते आणि त्याचा विपरित परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो; हे लक्षात घेऊन घनकचऱ्याच्या डोंगरांचा प्रश्न निकाली लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. मात्र कोवीडमूळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकासारख्या लहान स्थानिक स्वराज्य संस्थांची सद्यस्थतीत खर्च करताना फार ओढाताण होत आहे. त्यामुळे अशा नवीन मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे जवळजवळ अशक्य असून या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजूरी देण्यासह आवश्यक तो निधीही लवकरात लवकर वितरीत करण्याबाबतचे निर्देश देण्याची आग्रही मागणी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री हरदीप सिंग पुरी यांना केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा