– केतन बेटावदकर
कल्याण दि.11 नोव्हेंबर :
1980 च्या दशकातील एका हृदयस्पर्शी हिंदी चित्रपटातील तो प्रसिद्ध संवाद — “अरे भाई, कोई है…?” आज पुन्हा कानात घुमतो आहे. त्या चित्रपटात एक असहाय्य पती आपल्या मरणाच्या दारात असलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी हतबल होऊन अशी हाक देतो. पण दुर्दैवाने, तो आवाज ऐकूनही कोणी पुढे येत नाही… त्याची ती हाक म्हणजे एक वेदना होती. आज, दशकांनंतर जणू तीच हाक, तीच वेदना आपल्या कल्याण शहराच्या प्रत्येक कोपऱ्यातून ऐकू येत आहे. शहर जणू आर्त स्वरात विनवणी करतंय “अरे भाई… कोई है? जो मला वाचवेल?” (“Arey Bhai… Is Anyone There?… A Heartfelt Cry of Kalyan Citizens Struggling to Breathe”)
नागरिकांसोबत शहराचाही श्वास कोंडलाय…
शहराचा श्वास कोंडला आहे, वाहतूक कोंडी, रस्त्यांची बिकट अवस्था, कचऱ्याचे ढीग, वाढते प्रदूषण, आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरची निराशा. कल्याणच्या रस्त्यांवर गाडी चालवणं म्हणजे एखाद्या रणांगणात प्रवेश करणं. खड्डे, धुळीचा पाऊस, आणि न संपणारी वाहतूक कोंडी — हेच आजचं वास्तव आहे. शहाड उड्डाणपूल बंद झाल्याने वाहतुकीचा ताण वालधुनी, पत्रीपुल आणि कल्याण पूर्वच्या रस्त्यांवर ओसंडून वाहतो आहे. नागरिकांना ऑफिसला, शाळेत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं म्हणजे दररोजचं युद्ध झालं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना श्वास घेणं कठीण झालंय, धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढलेत, वृद्ध नागरिकांना रस्त्यांवर चालणं अवघड झालंय, पावसाळ्यात तर रस्त्यांवरील खड्डे म्हणजे जीवघेणा सापळाच. यामध्ये सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने निर्माण झालेला प्रश्न म्हणजे “अरे भाई कोई है…?”
एकेकाळी सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ओळख निर्माण केलेलं कल्याण शहर आज विकासाच्या नावाखाली गोंधळलेल्या व्यवस्थापनाचं प्रतीक बनलं आहे. शहाड उड्डाणपूल बंद झाल्याने वाहतूक ठप्प, नव्या रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा त्रास, तर आरोग्याच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. शहराचा हा आवाज ऐकणं गरजेचं आहे, कारण ही केवळ एक मागणी नाही, तर एक वेदना आहे. या वेदनेतून निर्माण झालेली हाक म्हणजे “अरे भाई कोई है?”
शहराच्या विकासाचा आराखडा केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलात यायला हवा. कारण कल्याण शहर केवळ इमारतींचा समूह नाहीये. आज इथल्या नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे. कोणी आहे का जो हे शहर पुन्हा जिवंत करेल? कोणी आहे का जो जबाबदारीने कल्याणचा काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळवेल? या शहराला पुन्हा नवा श्वास देईल ?त्याचं वैभव परत आणेल? खऱ्या अर्थाने या शहराला कोणी “वाली” आहे की नाही? अरे भाई…कोई है?…अरे भाई…कोई है?…अरे भाई…कोई है?
©️©️- केतन बेटावदकर

