कल्याण, दि. २८ एप्रिल :
शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणे आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणे अत्यावश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून परवाना निलंबन किंवा रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक अधिकारी प्र. म. देशमुख यांनी कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांना दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौक येथील हॉटेल वृंदावन व्हेज येथे कल्याण हॉटेल असोसिएशनच्या सर्व सदस्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अन्न-औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच कल्याण विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. (Awareness Program for Hoteliers in Kalyan; Food & Drug Administration Issues Strict Guidelines on Use of Analog Paneer/Cheese)
या कार्यक्रमात हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम (अनालॉग) पनीर/चीज संदर्भातील नियम, त्याचे ग्राहकांना देताना पाळावयाच्या अटी तसेच त्यावरील कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अन्न – औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अनेक ठिकाणी ‘चीज अनालॉग’ (cheese analogues) म्हणजेच कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी संबंधित पदार्थाबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे.
यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक अधिकारी प्र. म. देशमुख यांनी कल्याण शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणे आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आले हे निर्देश :
* हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये अनालॉग पनीर किंवा चीज वापरल्यास त्याची स्पष्ट नोंद करणे आवश्यक
* मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड किंवा बिलावर संबंधित माहिती नमूद करणे बंधनकारक
* ग्राहकांना पदार्थाच्या स्वरूपाबाबत पारदर्शक माहिती देणे आवश्यक
तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की, Food Safety and Standards Authority of India अंतर्गत लागू असलेल्या अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच लेबलिंग आणि डिस्प्ले नियम २०२० नुसार हे नियम बंधनकारक आहेत.
या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश हॉटेल व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहकांना सुरक्षित आणि पारदर्शक अन्नसेवा मिळावी हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

