Site icon LNN

बी. के. बिर्ला महाविद्यालयात नवसाहित्यिकांचा गौरव ; कोंकण प्रांतातील नवलेखक- साहित्य अभ्यासकांचा अनोखा सन्मान सोहळा

कल्याण | दि. १ फेब्रुवारी :
बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे पुरस्कृत साहित्य भारती प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण प्रांतातील नवलेखक व साहित्य अभ्यासकांच्या सन्मानार्थ आयोजित विशेष समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. (B.K. Birla College Felicitates Emerging Writers from Konkan Region)

या सन्मानासाठी कोंकण प्रांतातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी त्रिस्तरीय आणि त्रिभाषिक नवलेखक शोध निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १२७ शैक्षणिक संस्थांकडून हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये एकूण १ हजार ५८७ निबंध प्राप्त झाले. पात्र परीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनानंतर ६९ विद्यार्थ्यांची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सन्मान समारंभाचे मुख्य पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक इंदुशेखर तत्पुरुष (जयपूर) उपस्थित होते. त्यांनी स्पर्धेसाठी निवडलेल्या ‘पर्यावरण संरक्षणात आपली भूमिका’, ‘वर्ष २०४७पर्यंत भारत कसा विकसित होईल’ आणि ‘स्वदेशी स्वीकारा : आत्मनिर्भर भारत घडवा’ या विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेशप्रताप सिंह यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी नवसाहित्यिकांसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दलाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले यांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न विचारणारे बनण्याचे महत्त्व सांगत ‘स्क्रोलर’ऐवजी ‘स्कॉलर’ बना असा संदेश दिला. प्रमुख उपस्थित डॉ. बलिराम गायकवाड यांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी साहित्याशी नाते दृढ करावे, असे आवाहन केले. सन्मानित अतिथी दुर्गेश सोनार यांनी साहित्यातील नैतिकता आणि राष्ट्रनिर्मितीतील साहित्याचे योगदान यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी केले. तर डॉ. बालकवी सुरंजे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सन्मान समारंभानंतर हिंदी, मराठी आणि आगरी भाषांतील कवींचा सन्मान करण्यात आला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या वसंत काव्योत्सवात ४० हून अधिक कवींनी विद्या देवी सरस्वती तसेच जीवनातील वसंत ऋतूचे महत्त्व या विषयांवर मराठी व हिंदी भाषांमध्ये कविता सादर केल्या.

या कवी संमेलनाचे यशस्वी संचालन कवी संजय द्विवेदी आणि सुनील महास्कर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य डॉ. हरीश दुबे, डॉ. श्रीधर फडके, डॉ. दुर्गेश दुबे, डॉ. सतीश पांडे, प्राजक्ता कुलकर्णी, रूबी दुबे, शुष्मिता सिंह, कशिश पांडे आणि सुमिता भोसले यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Exit mobile version