(Ai Generated image)
लग्नातील आहेराप्रमाणेच आता हॉस्पिटलमध्येही मदतीचा लिफाफा; मुकुल गरे यांचा हृदयस्पर्शी उपक्रम
कल्याण | १७ जून :
लग्नसमारंभात आपण आनंदाने जातो. मंडप सजलेला असतो, सनईचे सूर घुमत असतात, नवदांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अशा वेळी आपण खिशातून लिफाफा काढतो आणि नव्या संसाराला हातभार म्हणून शेकडो, हजारो रुपयांचा आहेर देतो. त्या आहेराची चर्चा होते, फोटो काढले जातात, कौतुक होते.
मात्र दुसरीकडे एखाद्या हॉस्पिटलच्या आयसीयूच्या बाहेर एक कुटुंब जीवन-मरणाच्या संघर्षातून जात असते. आत आपल्या माणसाचा श्वास यंत्रांवर सुरू असतो आणि बाहेर औषधांच्या चिठ्ठ्या, तपासण्यांची बिले आणि पैशांची जुळवाजुळव यांचे युद्ध सुरू असते. अशा वेळी धीर देणारे अनेक असतात, पण आर्थिक आधार देण्यासाठी पुढे येणारे फारच कमी.
याच वास्तवाची जाणीव ठेवून कल्याणातील मुकुल गरे यांनी समाजासमोर एक वेगळी आणि माणुसकी जपणारी संकल्पना मांडली आहे –‘हॉस्पिटल लिफाफा’. बाईक घसरून अपघातात जखमी झालेल्या आपल्या मित्राला स्वतःहून आर्थिक मदतीचा लिफाफा देत त्यांनी या चळवळीची सुरुवात केली आहे. (Beyond Get-Well Wishes: Kalyan Man Starts ‘Hospital Envelope’ Initiative to Bring Hope and Support to Patients’ Families)
विशेष म्हणजे मुकुल गरे हे स्वतः आयसेन मेंगर सिंड्रोम या दुर्मीळ आणि गंभीर हृदयरोगाने त्रस्त आहेत. हृदयाला असलेले दोन सेंटीमीटरचे छिद्र, त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या, रुग्णालयातील फेऱ्या, उपचारांचा खर्च आणि कुटुंबाची होणारी घालमेल याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या कुटुंबावर कोणता मानसिक, भावनिक आणि आर्थिक ताण असतो, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे.
अनेकदा रुग्णाच्या नातेवाईकांकडे औषधासाठी, इंजेक्शनसाठी किंवा तपासणीसाठी पैसे कमी पडतात. घरातील दागिने विकले जातात, बचती मोडल्या जातात, नातेवाईकांकडे हात पसरले जातात. अशा वेळी कोणी स्वतःहून पुढे येऊन दिलेले शंभर, पाचशे किंवा हजार रुपयेही त्या कुटुंबासाठी अमूल्य ठरतात. हे कटू सत्य पाहता काही तरी करावे असा विचार आपल्या डोक्यात घोंघावत होता.
“काळजी करू नका, सगळं ठीक होईल” असे शब्द दिलासा देतात, पण कधीकधी त्या दिलाशासोबत दिलेला छोटासा लिफाफा एखाद्या इंजेक्शनची व्यवस्था करू शकतो, एखादी तपासणी पूर्ण करू शकतो आणि कदाचित एखाद्याचा श्वासही वाचवू शकतो,” असे मुकुल गरे यांनी सांगितले.
ही संकल्पना केवळ एका व्यक्तीच्या उपक्रमापुरता न राहता समाजात माणुसकीचे हरवलेले धागे पुन्हा जोडणारी चळवळ बनू शकते. आज समाजात आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र दुःखाच्या काळात हात धरून उभे राहणारे मोजकेच असतात. मुकुल गरे यांनी सुरू केलेला ‘हॉस्पिटल लिफाफा’ उपक्रम ही केवळ आर्थिक मदतीची संकल्पना नसून संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलासा देणारी माणुसकीची चळवळ आहे. उद्या कोणावरही कठीण प्रसंग येऊ शकतो. अशा वेळी आपला छोटासा हातभार एखाद्या कुटुंबासाठी जीवनदायी ठरू शकतो. त्यामुळे ‘हॉस्पिटल लिफाफा’ ही प्रथा केवळ कल्याणपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजात रुजावी, अशी अपेक्षा मुकुल गरे यांनी व्यक्त केली आहे.
*कोण आहेत मुकुल गरे…*
मुकुल गरे हे जनसंपर्क सल्लागार, प्रेरणादायी वक्ते, वैद्यकीय समुपदेशक, अभिनेते आणि लेखक म्हणून ओळखले जातात. ‘झुंज श्वासाशी’ या त्यांच्या प्रेरणादायी पुस्तकाला महानायक अमिताभ बच्चन यांचीही दाद मिळाली आहे. स्वतः गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही ते समाजात सकारात्मकता, प्रेरणा आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. इतकेच नाही तर आयसेन मेंगर सिंड्रोम हा दुर्मीळ गंभीर हृदयरोग असणारे लाँगेस्ट लिव्हिंग पर्सन म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया एलाईट बुकमध्ये त्यांची नोंद झाली आहे.
संपर्क : 91673 04691

