दिपेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवली – कल्याणातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
डोंबिवली दि.9 नोव्हेंबर :
भाजपवर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महापौर देईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. (Bharatiya Janata Party (BJP) will appoint the next Mayor in Kalyan-Dombivli, says BJP State President Ravindra Chavan)
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या विविध माजी नगरसेवक – विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. डोंबिवली जिमखान्याच्या मैदानावर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, कुमार आयलानी आदी वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश संपन्न झाले.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. त्यामुळे या सर्वांच्या विश्वासाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश कोणताही तडा जाऊ देणार नाही. दीपेश म्हात्रे यांच्या रूपाने एक चांगले युवा नेतृत्व भाजपमध्ये आले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तर या महानगरपालिकेला एक पारदर्शक महापौर देणे ठरले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पारदर्शक महापौर देईल अशी ग्वाहीही चव्हाण यांनी यावेळी दिली.
या पदाधिकाऱ्यांचा झाला भाजप प्रवेश…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक रत्नाताई पुंडलिक म्हात्रे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा परिवारात प्रवेश केला.
डोंबिवली एमआयडीसीतील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ८५च्या माजी नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, युवसेना कल्याण जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे, विभाग प्रमुख रविंद्र म्हात्रे, जयेश चकोर, शाखाप्रमुख बाळकृष्ण कानडे, विभाग महिला संघटक अनुजाताई सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी…
तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख संजय गायकवाड ,माजी नगरसेवक देवानंद गायकवाड ,डॉ पूजा संजय गायकवाड यांनीही आज भाजपात प्रवेश केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश…
काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव संतोष केणे, राहुल केणे, प्रणव केणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष तरे, कल्याणातील ज्वेलर्स आणि व्यापारी असोसिएशनचे राकेश मुथा यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला.

