Home ठळक बातम्या खोटं बोलून लोकांपुढे जाणार नाही – युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे

खोटं बोलून लोकांपुढे जाणार नाही – युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे

कल्याण दि.8 जानेवारी :
एक तरुण राजकारणी म्हणून आपण आजचे चित्र आणि भविष्यातील चित्र या दोन दृष्टिकोनातून विचार करीत असतो. माझे वय पाहता जनतेला मला खूप वर्षे उत्तरं द्यायची आहेत. त्यामूळे आपण खोटं बोलून लोकांपूढे जाणार नाही अशी प्रांजळ कबुली युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी कल्याणात बोलताना दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महत्वाकांक्षी सिटीपार्क प्रकल्पाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही कबुली दिली.

आपण राजकारणात आलो तेव्हा वेगळा दृष्टिकोन होता. राजकारण म्हणजे निवडणूक नाही तर 2 निवडणुकांच्या मधल्या काळात जे होते ते राजकारण असते. आणि शिवसेनेने राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शिवसेना नेहमीच जनहिताची कामे करीत आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तर निवडणुकीत हार आणि जीत सुरूच असते. मात्र या कामातून मिळणारे आशिर्वाद महत्वाचे असतात. नुसते इंटरनेट, केबल, वायफाय यांची कनेक्टिव्हिटी असणारी स्मार्टसिटी नकोय तर सर्व मूलभूत सोयी सुविधांची चांगली सिटी असणे आवश्यक आहे. तर ठाण्यात आपण काही प्रकल्प राबवण्याचा विचार करत असून त्यापैकी एक असणारा हवाई रिक्षा हा प्रकल्प कल्याण डोंबिवलीतदेखील राबवला जाऊ शकतो असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

तर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांचे कल्याण डोंबिवलीकडे बारीक लक्ष असते. आज भूमीपूजन झालेला हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच आपल्याला मिळालेल्या आरोग्यमंत्रीपदातून कल्याण डोंबिवलीला भेडसावणारे आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही शिंदे म्हणाले. तर पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्वछता आणि रस्ता रुंदीकरणाच्या विषयावरून पुन्हा एकदा पालिका आयुक्तांना कानपिचक्या दिल्या.

तर कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी नागपूर शहराप्रमाणे याठिकाणीही प्रकल्प राबवणे आवश्यक असून स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण डोंबिवलीत 1 हजार 440 कोटींची विकासकामे सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. पुण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे उभारणार, नदी आणि खाडीकिनारा सुशोभीकरण करण्यासाठी 60 कोटी निधीझ जलवाहतुकी सुरू होण्यासाठी कल्याण डोंबिवलीत 2 जेट्टी उभारणार असल्याचे राज्यमंत्री चव्हाण म्हणाले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, स्थानिक नगरसेवक दया गायकवाड, पालिका आयुक्त गोविंद बोडके, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना नेते रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*