Home ठळक बातम्या केडीएमसीचा 38 वा वर्धापन दिन : नियोजनशून्य आणि दिशाहीन कारभाराची ‘प्रतिमा’ बदलण्याचे...

केडीएमसीचा 38 वा वर्धापन दिन : नियोजनशून्य आणि दिशाहीन कारभाराची ‘प्रतिमा’ बदलण्याचे मोठे आव्हान

कल्याण दि.1 ऑक्टोबर :
कल्याण आणि डोंबिवली. एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले तर दुसरे सांस्कृतिक वारसा असणारे शहर. अशा दोन्ही शहरांची मिळून बनलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका. या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आज 38 वा वर्धापन दिन. या 38 वर्षांमध्ये गेल्या दिड वर्षांचा अपवाद सोडल्यास उर्वरित कारकिर्दीचा अनुभव पाहता नियोजनशून्य विकास आणि दिशाहीन कारभाराची बनलेली प्रतिमा बदलण्याचे मुख्य आवाहन उभे ठाकले आहे.

1983 ला स्थापना आणि प्रशासकीय राजवट…
1 ऑक्टोबर 1983 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना झाली. आणि आजही अस्तित्वात असणाऱ्या 27 गावांच्या प्रश्नामुळे महापालिकेमध्ये त्यावेळी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. पुढची तब्बल 12 वर्षे म्हणजे 1995 पर्यंतचा काळ कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रशासकीय राजवटीखाली गेला. या प्रशासकीय राजवटीत यूपीएस मदान, टी. चंद्रशेखर यांच्यासारखे धडाडीचे अधिकारी आयुक्त म्हणून लाभले. ज्यांनी आपापल्या परीने कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा सुधरवण्यासाठी प्रयत्न केला.

1995 ची पहिली महापालिका सार्वत्रिक निवडणूक…
1995 साल उजाडले आणि केडीएमसीत लागू झालेली प्रशासकीय राजवट मागे घेण्यात आली. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. 1995 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, ज्यामध्ये राज्यातील सत्तेमध्ये एकत्र असूनही शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले. या पहिल्या वहिल्या निवडणुकीत अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने केडीएमसीवर आपला भगवा फडकवला. आरती मोकल यांना शहराच्या प्रथम नागरिक अर्थातच महापौरपदी बसण्याचा मान मिळाला. तर विरोधी पक्षनेतेपदाचा बहुमान भाजपच्या हरिश्चंद्र पाटील यांना मिळाला. 1995 ते 2000 या कालखंडात केडीएमसीतील लोकप्रतिनिधींमध्ये कल्याण डोंबिवलीसाठी काहीतरी चांगले करण्याची प्रबळ इच्छाशक्ती जाणवत होती. आणि लोकप्रतिनिधींच्या या इच्छाशक्तीला टी. चंद्रशेखर यांच्यासारख्या धडाकेबाज पालिका आयुक्तांची साथही होती. त्यामुळेच 1995 ते 2000 या कालखंडातील लोकप्रतिनिधींच्या अभ्यासपूर्ण कामगिरीमूळे महासभेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवले.

दर निवडणुकागणिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा कामाचा दर्जा ढासळता…
मात्र त्यानंतर हळूहळू लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दर्जाला अशी काही गळती लागली की आधीच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अभ्यासपूर्ण कामाने निर्माण केलेल्या दर्जाचे स्थान उंचावणे तर दूरच. मात्र जी होती ती उंचीही टिकवता आली नाही. असे एकंदरीत आतापर्यंतच्या परिस्थितीवरून दुर्दैवाने म्हणावे लागेल. दर निवडणुकागणिक केडीएमसीतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा कामाचा दर्जा ढासळतच गेला. कल्याण डोंबिवलीत आज निर्माण झालेल्या आणि गंभीर रूप धारण केलेल्या नागरी समस्या या त्याच दर्जाहीन, दिशाहीन आणि नियोजनशून्य कारभाराचे प्रतिक म्हणून आ वासून उभ्या राहिल्या आहेत.

सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन अपयशी…
मग ती कचऱ्याची समस्या असो की अनधिकृत बांधकामाची, रस्त्यांची समस्या असो की रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची, विकासकामे पूर्ण करण्याची असो की शहर नियोजनाची. ज्या ज्या गोष्टी मिळून एक सुंदर आणि सुनियोजित शहर बनते त्या सर्व गोष्टी करण्यात केडीएमसीतील तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासन अपयशी ठरले. शहराच्या गरजा काय, तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या आवश्यकता काय? यासाठी आवश्यक ती कामे सुचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची. तर लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे सुनियोजनबद्धतेने पूर्ण करण्याचे प्रशासनाचे काम. मात्र गेल्या काही वर्षांतील कल्याण डोंबिवलीचे चित्र बरोबर याच्या उलटेच दिसून येते. तर सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याची महत्वाची जबाबदारी असणारे विरोधकही आपली भूमिका चोखपणे बजावण्यात अपयशी ठरले आहेत. कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांवरून सत्ताधारी – प्रशासनाला धारेवर धरण्याऐवजी विरोधक त्यांच्या तालावरच नाचताना दिसून आले.

टक्केवारी आणि भ्रष्टाचाराने कल्याण डोंबिवली शहरांचा बट्ट्याबोळ…
बरं आयुक्त म्हणून बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्याला या शहरांविषयी काही कळवळा नसल्यास तो आपण समजू शकतो. मात्र या शहरात राहणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनाही (अपवादात्मक काही असू शकतील) कल्याण डोंबिवली ही चांगली शहरं व्हावीत हे वाटू नये यापेक्षा दुर्दैव ते काय असेल? ही शहरे अधिकाधिक बकाल करण्यासाठी आणि खड्डयात घालण्यासाठीच लोकप्रतिनिधीना निवडून दिले का? या शहराचे विद्रुपीकरण करण्यासाठीच नागरिक कर भरतात का? ही शहरे भकास करण्यासाठीच प्रशासनातील अधिकाऱ्यांना पगार दिला गेला का? यांसारखे संतप्त सवाल नागरिकांच्या मनात आल्यावाचून राहत नाही. या पावणे चार दशकांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला एकमेकांच्या साथीने अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध असा विकास करता आला असता.

यंदाच्या प्रशासकीय राजवटीत चांगले काम…
गेल्या वर्षभरापासून केडीएमसीमध्ये प्रशासकीय राजवट आहे. डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामावर कोणीही बोट ठेवू शकत नाही. विशेष म्हणजे कोरोना काळातही केडीएमसी प्रशासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली विकासकामे मार्गी लावल्याचे दिसत आहेत. एकंदरीतच केडीएमसी प्रशासनातील सध्या अस्तित्वात असणारी अधिकाऱ्यांची टिम ही आतापर्यंतच्या सर्वात चांगल्या टीमपैकी एक असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गेली इतके वर्षे प्रशासनात अभावाने आढळणारी इच्छाशक्ती आणि विकासाचे व्हिजन आताच्या प्रशासनात जाणवत आहे. त्यामुळेच आज सोबतीला लोकप्रतिनिधींची साथ नसतानाही त्यांनी अनेक आव्हानात्मक विकासकामे आणि प्रश्न मार्गी लावले आहेत.

शहराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी आणि विद्रुप झालेला चेहरा मोहरा पुन्हा सुंदर बनवण्यासाठी यूपीएस मदान, टी. चंद्रशेखर, ई. रविंद्रन, डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासारख्या सकारात्मक आयएएस अधिकाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. केडीएमसीची सार्वत्रिक निवडणुक येऊ घातली असून त्यात निवडून येणारे लोकप्रतिनिधी तरी स्वार्थिक विकासासोबत कल्याण डोंबिवलीच्या विकासाकडेही लक्ष देतील अशी आशा आहे.

– केतन बेटावदकर

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (1 ऑक्टोबर) 22 ठिकाणी लसीकरण
पुढील लेखमनसे सहकार सेनेतर्फे कल्याणात हौसिंग सोसायटीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा