Home ठळक बातम्या केडीएमसीला मोठा दिलासा : राज्य शासनाकडून मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी १६८ कोटी रूपये...

केडीएमसीला मोठा दिलासा : राज्य शासनाकडून मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी १६८ कोटी रूपये मंजुर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली दि.2 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि आसपासच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कल्याण रिंगरोड उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच माणकोली मोठागाव येथील उल्हास नदीवरील पूलही अंतिम टप्प्यात आहे. याच पुलाचा पुढचा भाग असलेला मोठागाव परिसरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर उड्डाणपूलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला द्यावा लागणाऱ्या १६८ कोटींच्या हिस्साचा भार राज्य सरकारने उचलत त्यासाठीचा निधी मंजुर केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे आणि स्थाानिकांच्या मागणीनंतर या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. शिंदे यांच्याच पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने हा निधी मंजुर केल्याने स्थानिकांनी डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहेत. (Big relief to KDMC: State government sanctioned Rs. 168 crores for mothagaon railway flyover)

पुलाच्या उभारणीनंतर मोठागाव वाहतुकीच्या केंद्रस्थानी…
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला गतीमान पर्याय देण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याण रिंगरोडची उभारणी केली जाते आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रिंगरोडचे काम प्रगतीपथावर असून त्यातले महत्वाचे टप्पे पूर्ण होत आहेत. काही दिवसांपूर्वी मोठागाव ते दुर्गाडी या टप्प्याची निविदा जाहीर होऊन कामाला सुरूवात झाली. तर या मार्गाला जोडल्या जाणाऱ्या माणकोली मोठागाव दरम्यान उल्हास नदीवरील पुलाची वेगाने उभारणी सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या उभारणीनंतर मोठागाव हा भाग वाहतुकीच्या केंद्रस्थानी येणार आहे.

या ठिकाणी पूल उभारण्याची दिपेश म्हात्रेंकडून मागणी…
याच पुलापुढील जोडरस्त्याला मोठागाव भागात रेल्वे मार्गिका छेदून जाते. या ठिकाणी पूल उभारण्याची स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत या कामाला गती देण्याची मागणी केली होती. या कामासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला आपला आर्थिक हिस्सा द्यावा लागणार होता. या कामासाठी आवश्यक भूसंपादन आणि पुनर्वसन मोबदला देण्यासाठी पालिकेला १६८ कोटींची आवश्यकता होती. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेला आर्थिक मदतीची गरज होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा हिस्स्याचा भार उचलण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही पाठपुरावा केला.

नगरविकास विभागाकडून 168 कोटींचा निधी मंजूर…
अखेर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतेच या केडीएमसीच्या हिस्स्यापोटी १६८ कोटी रूपये देऊ केले आहेत. यात रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी ५० टक्के अर्थात ३० कोटी रूपये आणि त्यातील बाधितांच्या पुनर्वसनासाठी १३८ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

केडीएमसीच्या तिजोरीवरील भार हलका…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीवरचा आर्थिक भार हलका करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे डोंबिवलीकरांच्या वतीने आणि मोठागाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले जात आहेत. तर कल्याण डोंबिवली महापालिकेला दिलासा दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या उपलब्ध निधीमुळे मोठागाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार असून कल्याण रिंगरोड प्रकल्पाच्या कामालाही बळकटी मिळणार आहे.

या भागाचे महत्व वाढण्यास मदत होणार…
येत्या काही दिवसात हा मार्ग पूर्णत्वास आल्यास या भागाचे महत्व वाढण्यास मदत होणार आहे. माणकोली मार्गे शहरात येणाऱ्या वाहनांना रेतीबंदर येथील रेल्वे फाटकात अडकून पडावे लागत असे. तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनाही यात अडकून पडावे लागत असे. या रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर माणकोली पुलावरून येणाऱ्या वाहनांना कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट डोंबिवलीत प्रवेश करता येणार असल्याने मोठा वेळ वाचणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा