मुख्य पुरवठादारासह पाच आरोपी जेरबंद
कल्याण | २२ मे :
कल्याणमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन (गर्द) जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना अटक करत आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. (Massive ₹34 Crore Heroin Seized in Kalyan; Interstate Drug Racket Busted, Five Arrested Including Main Supplier)
पोलिस उपायुक्त परिमंडळ ३, अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक आणि महात्मा फुले चौक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कल्याणच्या बैलबाजार परिसरातील सांगळेवाडी भागात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन जणांना गस्तीदरम्यान ताब्यात घेतल्यानंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरपन, खांडेकर आणि खरसाण यांनी ही कारवाई केली आहे.
तपास अधिक खोलात गेल्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे मुंबई, कल्याण, इगतपुरी आणि इतर भागांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य पुरवठादार अमजद युसूफ पठाण याच्यासह कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम गफूर शेख यांचा समावेश आहे. पोलिस तपासात या आरोपींपैकी काहींवर यापूर्वी खून, मोक्का, NDPS अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही समोर आल्याचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
यातील मुख्य आरोपी अमजद पठाण हा मोठ्या प्रमाणावर हेरॉईन पुरवठा करणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्या अटकेनंतर या रॅकेटमधील धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमजदवर यापूर्वी कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबईसह मध्य प्रदेश आणि राजस्थामध्येही २० गुन्हे दाखल आहेत. तर कासिम वसईकरवर कल्याण डोंबिवलीमध्ये ३ तर सद्दाम शेखवर महात्मा फुले पोलीस ठाण्यातच ७ गुन्हे दाखल आहेत. या कुख्यात आरोपींकडून जप्त अंमली पदार्थांचा हा मोठा साठा विक्री होण्यापूर्वीच कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे कल्याणसह ठाणे परिसरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या या आक्रमक मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत. तर कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात अधिक आक्रमकपणे कारवाया सुरूच ठेवत त्यांचे कंबरडे मोडले आहे. कल्याण पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

