Home ठळक बातम्या सोशल मिडियावरील भाजप – काँग्रेसचे ड्रेसिंगवॉर आले रस्त्यावर

सोशल मिडियावरील भाजप – काँग्रेसचे ड्रेसिंगवॉर आले रस्त्यावर

कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी

कल्याण दि.१२ सप्टेंबर :
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मिडियावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. मात्र हा वाद आता सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या मुलासंदर्भात बॅनर लावत कल्याण जिल्हा काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. मात्र या भारत जोडो यात्रेएवढीच किंवा त्यापेक्षा अधिक राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टची चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. या विषयावरून सोशल मीडियावर तर काँग्रेस आणि भाजपमध्ये अक्षरशः रणकंदन माजले आहे. परंतू सोशल मीडियावर सुरू असणारे हे काँग्रेस आणि भाजपचे ड्रेसिंग वॉर आता थेट रस्त्यावर येऊन पोहोचले आहे.

सध्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुलाचा संदर्भ देत कल्याण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे आणि पश्चिमचे ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांनी बॅनर लावत भाजपला लक्ष्य केले आहे. या बॅनरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या मुलाने महागडे टी शर्ट घातल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ‘ असा शब्द प्रयोग करत विमल ठक्कर यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्ट वरून भाजपाने टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाने हे बॅनर लावले आहे. देशामध्ये सध्या महागाई, बेरोजगारी असे गंभीर विषय असताना नको ते विषय काढून भाजप देशातील नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही या बॅनरद्वारे करण्यात आला आहे.

दरम्यान एकमेकांनी घातलेल्या महागड्या कपड्यांवरून सध्या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे कपडे काढण्याची जी जुगलबंदी रंगली आहे त्यामूळे संबंधित ब्रँडची मोफत जाहिरात होण्यासह लोकांचेही चांगले मनोरंजन होत आहे.

मागील लेखराहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेत टुकडे टुकडे गँगही सहभागी – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप
पुढील लेखअशी कशी ही स्मार्ट सिटी? केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे केडीएमसी प्रशासनाला खडे बोल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा