Site icon LNN

भाजप नगरसेवक शामल गायकर यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव; पॅनकार्ड-आधारकार्ड बदल आणि सुकन्या समृद्धी योजना शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण | २८ जून :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातीलपॅनल क्रमांक ७ मध्ये भाजप नगरसेवक शामल गायकर यांच्या माध्यमातून दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (BJP Corporator Shamal Gaikar Felicitates Meritorious Students; PAN Card, Aadhaar Update and Sukanya Samriddhi Scheme Camps Receive Enthusiastic Response)

यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक आणि शिक्षकांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि त्यांच्या आवडीची शालेय बॅग देऊन नगरसेवक शामल गायकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला.

याच उपक्रमांतर्गत परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी नवीन पॅनकार्ड, आधारकार्ड नोंदणी तसेच नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी दुरुस्तीची कामे करून घेतली. नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.

याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुकन्या समृद्धी योजना’ शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला. मुलींच्या सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम भविष्यासाठी असलेल्या या योजनेची माहिती घेण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी अनेक पालकांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली. या योजनेचे फायदे, गुंतवणुकीचे स्वरूप आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शामल गायकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणे होय. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या शासकीय सेवांचा लाभ त्यांच्या परिसरातच मिळावा, हा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळातही शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि नागरिकहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

शिक्षणाला प्रोत्साहन, नागरिकांना शासकीय सेवा आणि मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या तिन्ही उपक्रमांना परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नगरसेवक शामल गायकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Exit mobile version