डोंबिवली दि.18 नोव्हेंबर :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमूख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. (BJP Sees Big Inflow Ahead of Elections; Prominent Dombivli Leaders Join the Party)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर होणे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय धुरळा आणि धामधूम दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, मनसे अशा प्रमूख पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी दस्तुरखुद्द भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिका निवडणुकीतील आपली जागा अबाधित ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
डोंबिवलीतील शिवसेनेतील (शिंदे गट) अनमोल म्हात्रे यांनी सपत्नीक आणि अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की दिवंगत वामन म्हात्रे यांचे आणि आपले जुने ऋणानुबंध होते. या शहराला एक वेगळीं पारदर्शकता आणायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ही गोष्ट अशक्य नाही असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

