भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची यशस्वी रणनिती
कल्याण डोंबिवली दि.1 जानेवारी:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत मतदानपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आखलेल्या रणनिती मोठे यश येताना दिसत आहे. त्यामुळेच तर मतदान आणि निकालापूर्वीच भाजपचे 5 तर शिवसेनेचे 4 असे दोघांचेही मिळून 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामूळे कल्याण आणि डोंबिवलीत दोन्ही पक्षांनी आपला दबदबा कायम ठेवत जोरदार मुसंडी मामारली आहे. इतकेच नाही तर निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी उद्याचा एक दिवस शिल्लक असून भाजप शिवसेनेचे आणखी उमेदवार बिनविरोध विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bjp-shiv-sena-alliance-dominates-kdmc-elections-9-candidates-elected-unopposed)
कल्याण पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी या महायुतीच्या बिनविरोध विजयाला प्रारंभ केला. त्यांच्यापाठोपाठ मग भाजपच्या महिला उमेदवार आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील आणि ज्योती पाटील यांनीही बिनविरोध विजयी होत भाजपच्या विजयाचा पाया रचला. तर त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र हर्षल मोरे हे चारही जण आपापल्या पॅनलमध्ये बिनविरोध निवडून आले. युतीच्या या विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले आहे. या बिनविरोध विजयामुळे आगामी मतदान आणि त्याचे निकाल येण्यापूर्वीच भाजप शिवसेना युतीच्या या विजयी घोडदौडीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामूळे भाजपा आणि शिवसेना पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
युतीचे बिनविरोध निवडून आलेले हे उमेदवार म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या यशस्वी रणनितीचे फलित असून उद्याच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही युतीचे आणखी काही
उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे आहेत महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
आसावरी नवरे – पॅनल २६ क – भाजप
रेखा चौधरी – पॅनल १८ अ – भाजप
रंजना पेणकर – पॅनल २६ ब – भाजप
मंदा पाटील – पॅनल २७ अ – भाजप
ज्योती पाटील – पॅनल 24 अ – भाजप
रमेश म्हात्रे – पॅनल 24 – शिवसेना
विश्वनाथ राणे – पॅनल 24 – शिवसेना
वृषाली जोशी – पॅनल 24 – शिवसेना
हर्षल मोरे – पॅनल 28 – शिवसेना

