कल्याण डोंबिवली दि.19 नोव्हेंबर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाल्यापासून केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ‘इलेक्शन मोडवर’ गेलेले दिसून येत आहेत. इतके दिवस पडद्याआड चालणाऱ्या राजकीय घडामोडी आता थेट राजकारणाच्या सार्वजनिक आखाड्यामध्ये येऊन पोहोचल्या आहेत. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यावर असणारा राजकीय फोकस आता चक्क महायुती आणि युती धर्माच्या मुद्द्यावर स्थिरावताना दिसत आहे. कारण महायुती, घटकपक्ष, मित्रपक्ष यापासून सुरू झालेले राजकारण आता थेट एकमेकांच्याच पक्षाला खिंडार पाडण्यापर्यंत आले आहे. ज्याचा हाय व्होल्टेज ड्रामा काल राज्याच्या मुख्य राजकारणात पाहायला मिळाला. (“BJP vs Shiv Sena: Friendly Fire Ahead of Civic Polls, But the Real Target is the Upcoming Lok Sabha & Assembly Elections?”)
आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही शहरातील राजकीय वातावरण गेल्या एक दिड महिन्यांपासून ढवळून निघाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाले नव्हते किंबहुना मर्यादित स्तरावर असणारे शह काटशहाचे राजकारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुक तयारीची लगबग सुरू झाल्यापासून खऱ्या अर्थाने इथल्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला. सुरुवातीला राजकीय विरोधक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दिग्गज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष भाजप शिवसेनेत फासे टाकण्यास सुरुवात झाली. या दोघांमधील ही चढाओढ इतकी वाढली की विरोधक राहिले बाजूला शिवसेना आणि भाजपमध्येच एकमेकांच्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना फोडण्याची स्पर्धा लागली. आणि मग कल्याण डोंबिवलीमध्ये किंबहुना कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील या मित्रपक्षांमध्येच खऱ्या अर्थाने राजकीय कुस्तीला सुरुवात झाली.
गेल्या काही आठवड्यांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे नेहमीचे राजकीय समीकरण बाजूला पडले असून आता संघर्षाची नवी रेषा महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आखली जात आहे का? महायुती धर्म, युती धर्म, मित्रपक्षांचे नाते…हे सर्व शब्द आता फक्त राजकीय भाषणांपुरतेच उरले की काय ?असा सवाल सध्या निर्माण झाला आहे.
एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण विरुद्ध खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा अप्रत्यक्ष मात्र थेट राजकीय सामना रंगू लागला. आणि त्यातूनच मग जसे “राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तसाच कोणी कोणाचा मित्रही नसतो” या राजकीय व्याख्येचे नाट्यप्रयोग सुरू झाले. एकीकडे महायुती, मित्रपक्ष म्हणून केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेकडून एकमकांविरोधात दंड थोपटण्यात आले. आतापर्यंत पडद्याआड सुरू असणाऱ्या भाजप सेनेमधील अंतर्गत कुरघोडींना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले.
मात्र या कुरघोडींचे केंद्रस्थान केवळ फोडाफोडीचे राजकारण, एकमेकांना शह काटशह देण्यापुरता मर्यादित असते तरी समजण्यासारखे होते. मात्र भाजप असो की शिवसेना या दोघांनीही, पूर्वीच्या काळात एकमेकांना देण्यात आलेल्या वागणुकीची, त्रासाची प्रथमच जाहीर वाच्यता करत त्याची एकमेकांना आठवणही करून दिली. त्याचसोबत आपापल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करत एकमेकांना थेट आव्हानही देण्यात आले.
या सर्व हाय व्होल्टेज राजकीय परिस्थितीला बाहेरून पाहिल्यास महापालिका निवडणुका जरी कारणीभूत दिसत असल्या तरी मुख्य टार्गेट मात्र काही वर्षांनी होणाऱ्या पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीच आखले जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कालच्या बैठकीनंतर या एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या राजकीय नाट्यावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. मात्र हा पडदा म्हणजे क्लायमॅक्सचा पडदा आहे की इंटरव्हलचा या मुख्य प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल अशी आशा आहे.

