भाजपमध्ये गेलेल्या महिला पदाधिकारी -कार्यकर्त्यांची मनसेत घरवापसी
कल्याण ग्रामीण | ७ सप्टेंबर :
कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात सध्या मनसेमधील हालचालींना वेग आला असून मनसेतून भाजपमध्ये प्रवेश महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. डोंबिवली येथे रविवारी मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांची झालेली ही घरवापसी आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. (“Bogus Voting Took Place in the 2024 Elections, I Will Be an MLA Again in Two-and-a-Half Years” – MNS Leader Raju Patil)
या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने स्थानिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे. “अडीच वर्षांनंतर आपण पुन्हा आमदार होणार,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. त्यामुळे पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेबरोबरच कल्याण-डोंबिवलीतील पुढील राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2024च्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची माहिती आपल्याला होती, मात्र त्यावेळी त्यावर प्रभावीपणे कारवाई करता आली नाही तसेच हा प्रकार पकडण्यातही यश आले नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, पक्षाच्या आगामी संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन करताना मतदार यादीवर विशेष लक्ष देण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करणे, पात्र मतदारांची नावे यादीत असल्याची खात्री करणे तसेच संबंधित एसआरए प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक पातळीवर पक्षबदल आणि पुन्हा झालेल्या घरवापसीमुळे मनसेमधील संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सुरू असलेल्या या संघटनात्मक हालचाली कितपत प्रभावी ठरतात, तसेच राजू पाटील यांच्या “अडीच वर्षांनी पुन्हा आमदार” या विधानाचे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात काय पडसाद उमटतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

