Home क्राइम वॉच स्वस्तात मिळणारी बाईक खरेदी करताय ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

स्वस्तात मिळणारी बाईक खरेदी करताय ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

बाईक चोरून त्यांची स्वस्तात विक्री करणारी टोळी मानपाडा पोलिसांकडून गजाआड

डोंबिवली दि.23 डिसेंबर :
तुम्हाला एखादी महागडी बाईक स्वस्तात मिळतेय म्हणून खरेदी करायचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण ही स्वस्तातील बाईक तुम्हाला चांगलीच महागात पडू तर शकतेच पण त्याशिवाय तुम्हाला लॉकअपची हवाही खायला लागू शकते. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी बाईक चोरणाऱ्या अशाच एका अट्टल चोरट्याला त्याच्या साथीदारांसह बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या पालेगाव गावातून दिपक सलगरेला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, मध्यवर्ती आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाईक चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या बाईक चोरण्यामागचे कारण ऐकून तर पोलीस चक्रावून गेले. दिपकचा प्रेम विवाह झाला असून पत्नीसोबत मौजमजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याची आणि त्यातून या बाईक चोरल्याचे सांगितल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. चोरलेल्या या बाईक्स दिपकने पलावा येथे राहणाऱ्या राहुल भागवत डावरे याच्या मदतीने गाड्यांचे पेपर नंतर बनवून देतो असे सांगून त्यांची स्वस्तात विक्री केली जायची. तर काही गाड्या या भंगार व्यावसायिक चिनमून चौहानला आणि चौहानने त्या गाड्यांचे सुट्टे भाग करून हे भंगार धर्मदेव रामचंद्र चौहान, समशेर शाबीर खान आणि भैरवसिंग प्रेमसिंग खरवड याना विकल्याचेही मानपाडा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

दरम्यान स्वस्तात बाईक मिळतेय म्हणून नागरिकांनी ती खरेदी करण्याच्या आमिषाला बळी पडू नये. अन्यथा येत्या काळात संबंधित बाईक चोरणाऱ्या आरोपींसोबत ही बाईक खरेदी करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील अशी इशारावजा तंबी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

 

या आरोपींकडून मानपाडा पोलिसांनी 17 बाईक्स, 23 बाईकचे इंजिन, 28 इतर सुट्टे भाग, 12 मॅकव्हील आणि एक कटर मशीन जप्त केल्याची माहितीही डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. या सर्व आरोपींवर मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, मध्यवर्ती, बाजारपेठ, कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीतील 16 गुन्हे उघडकीस आले असून येत्या काळात आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोलीस शिपाई संतोष वायकर, ताराचंद सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, अशोक आहेर आदींच्या पथकाने केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा