Home ठळक बातम्या 50 फूट खोल विहिरीत पडली मनीमाऊ ; ही युक्ती वापरून अग्निशमन दलाने...

50 फूट खोल विहिरीत पडली मनीमाऊ ; ही युक्ती वापरून अग्निशमन दलाने काढले बाहेर

कल्याण पश्चिमेच्या कासारहाट येथील प्रकार

कल्याण दि. 28 मार्च :
एकमेकींशी भांडताना विहिरीत पडलेल्या एका मांजरीला केडीएमसी फायर ब्रिगेडने अथक प्रयत्नांनी बाहेर काढत जीवदान दिले. कल्याण पश्चिमेच्या कासारहाट परिसरात आज सकाळी हा प्रकार घडला असून मांजरीचा जीव वाचवल्याबद्दल अग्निशमन दलाचे कौतुक होत आहे.

कल्याण पश्चिमेच्या कासारहाट येथील विठ्ठल मंदिरासमोर एक जुनी विहीर आहे. या परिसरात आज सकाळी दोन मांजराचे जोरजोरात भांडण सुरू झाले. आणि या भाडणांच्या दरम्यान त्यातील एक मांजर विहिरीत पडली. विहिरीच्या परिसरातून मांजरीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने काही विहिरीमध्ये येऊन डोकावले. त्यावेळी खोल विहिरीत ही मांजर पडलेली त्यांना दिसून आले. आणि विहिरीबाहेर येण्यासाठी ही मांजर ओरडत होती. भीतीपोटी ही मांजर विहिरीच्या एका कपारीत जाऊन बसली होती. स्थानिकांनी या मांजरीला बाहेर काढण्यासाठी काहीसे प्रयत्नही करून पाहिले. मात्र त्यात फारसे यश न आल्याने अखेर केडीएमसी अग्निशमन दलाला याठिकाणी बोलवण्यात आले.

 

बाहेर काढण्यासाठी 3 तासांचे अथक प्रयत्नही निष्फळ …

त्यानंतर केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांपैकी एक जवान खाली विहिरीत उतरला आणि या मांजरीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र घाबरून ही मांजर विहिरच्या कपारीत जाऊन बसल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर अग्निशमन दलाने जाळी आणि पाळणा टाकून त्याद्वारे या मांजरीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तेही निष्फळ ठरले. अग्निशमन दलाने जवळपास तीन तास वेगवेगळ्या प्रकारे या मांजरीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.

माशाचे तुकडे पाहीले आणि मनीमाऊ बाहेर आली…

अखेर त्याचदरम्यान कोणाला तरी एक युक्ती सुचली आणि मग त्यांनी या दोरीच्या पाळण्यामध्ये मांजरींना सर्वात प्रिय असणारे माशाचे तुकडे ठेवले. आणि मग हा पाळणा खाली विहिरीत ही मांजर बसलेल्या कपारीजवळ सोडण्यात आला. आणि आश्चर्य असे की तीन तास विहिरीच्या कपारीत ठिय्या मांडून बसलेली ही मनीमाऊ या माशांच्या तुकड्यांच्या वासाने काही सेकंदातच बाहेर आली. आणि चटकनदिशी या दोरीच्या पाळण्यात चढली. मग अग्निशमन दलानेही क्षणाचाही विलंब न लावता दोरी खेचून या मांजरीला बाहेर काढले. आणि अग्निशमन दलासह सर्वांना तीन तास मेहनत करायला लावणारी ही मनीमाऊ मग बाहेर येऊन काही क्षणातच आल्यापावली निघून गेली.

केडीएमसी अग्निशमन दलाच्या लिडींग फायरमन सनी भगरे यांच्यासह सनी पारधी, हेमंत आसकर, आकिब तिरंदाज, निखिल जाधव आणि जय पाटील यांच्या पथकाने या मांजरीचा जीव वाचवला. त्याबद्दल या सर्वांचे कौतुक केले जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा