Home क्राइम वॉच कल्याण शहर ज्वेलर्स संघटनेतर्फे कल्याणात गर्दीच्या ठिकाणी उभारण्यात येणार सीसीटीव्हीचे जाळे

कल्याण शहर ज्वेलर्स संघटनेतर्फे कल्याणात गर्दीच्या ठिकाणी उभारण्यात येणार सीसीटीव्हीचे जाळे

पहिल्या टप्प्यात बसविण्यात येणार  25 सीसीटीव्ही कॅमेरे

कल्याण दि. 7 मार्च :
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखत नागरिकाच्या सुरक्षेसाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. मात्र हे कॅमेरे अपुरे असल्याने शहरातील प्रतिष्ठीत नागरिक – व्यापाऱ्यांनी ‘एक कॅमेरा देशा’साठी या मोहिमेअंतर्गत आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत कल्याण शहर ज्वेलर्स असोसीएशनतर्फे कल्याण पश्चिमेत २५ कॅमेरे बसविले जात आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरं अत्यंत दाटीवाटीच्या लोकसंख्येची समजली जातात. परिणामी इथल्या प्रमूख चौक आणि परिसर नेहमीच गर्दीने फुललेले पाहायला मिळतात. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी गर्दीच्या तुलनेत त्यांची संख्या तोकडीच आहे. आजमितीस कल्याण पश्चिमेच्या एकट्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणखी ३९४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता असल्याचे पोलीस प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. पालिका प्रशासनाकडून शहराच्या प्रमूख ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे संख्येने कमी असल्याने इथल्या प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पुढे येऊन ‘एक कॅमेरा देशासाठी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केले होते.

त्याला कल्याणच्या ज्वेलर्स असोसीएशनचे अध्यक्ष राकेश मुथा यांनी या सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात २५ कॅमेरे बसविण्याची तयारी दर्शवली. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि हाय रिझोल्युशन लालचौकी ते स्टेशन परिसरातील एसीपी ऑफिसपर्यंत बसवण्यात येत असल्याची माहिती ज्वेलर्स संघटनेचे अध्यक्ष राकेश मुथा यांनी दिली. या परिसरात असणाऱ्या दुकांनाबाहेर ते लावण्यात येणार असून रस्त्याच्या दिशेने सर्व हालचाली त्यात टिपल्या जाणार आहेत.

तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे २४ तास सुरक्षेची हमी मिळत असल्याने गुन्ह्याची उकलही कमीत कमी वेळेत करणे शक्य झाले आहे. केवळ चैन स्नॅचिंगच नव्हे तर घरफोड्यासारख्या विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासात हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतील अशी प्रतिक्रिया महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा