Home ठळक बातम्या ‘दिव्यांग’ हा शब्दच काढून टाकण्याची गरज – ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे

‘दिव्यांग’ हा शब्दच काढून टाकण्याची गरज – ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे

 

कल्याण दि.1 ऑक्टोबर :

दिव्यांग शब्द काढून टाकला पाहिजे. कारण हे सर्व बांधव इतरांप्रमाणे काम करण्यास सक्षम असल्याने हा शब्द काढून टाकण्याची गरज मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. ,खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेतून मदत साहित्याचे वाटप करण्यासाठी कल्याण (पू.) येथील तिसाई देवी माता मंदिर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांची  उपस्थिती लाभली.

 पूर्वी लोक डॉक्टरांना देवाच्या जागी मानत होते. अनेक डॉक्टर दुर्गम भागात विनामुल्य सेवा करायचे. आजही काही डॉक्टर समाजसेवेसाठी पुढाकार घेऊ लागले आहे . ही बाब आनंदाची आहे. विनामुल्य गरजूना सेवा देणारे असे डॉक्टर इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून आज लोकांच्या मनात असलेली डॉक्टरांची प्रतिमा बदलत असल्याचे ते म्हणाले.आज  दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत. मात्र त्याच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. एकीकडे देश मंगळ ग्रहावर जाऊन नवा पराक्रम करत आहे. मात्र दुसरीकडे गरजू केंद्र शासनाच्या अनेक योजना या बांधवांपर्यंत पोहचत नाहीत. हे देशाचे दुर्भाग्य आहे अशी खंतही आमटे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या वेळी साडेआठशेहुन अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, स्मार्ट फोन, ब्रेल किट आदी विविध मदत साहित्याचे विनामूल्य वाटप  करण्यात आले. तसेच नवीन दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा नोंदणीही करण्यात आली.

तर आपण आज केवळ पालकमंत्री म्हणून नव्हे तर पिता म्हणून याठिकाणी उपस्थित आहोत. कारण गेले वर्षभर दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी किती तळमळीने श्रीकांत पाठपुरावा करत होता. हे मी बघत होतो. दिव्यांग बांधवांना खरोखर संधीची गरज असते आणि संधी मिळाली तर ते काय चमत्कार करू शकतात असे गौरवोद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.  आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जी सुंदर गाणी आणि नृत्याचे सादरीकरण केले, त्यावरून बघितले. कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट चढणारे विनोद रावत यांचीही प्रेरणादायी कहाणी आपण त्यांच्याच तोंडून ऐकली. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सक्षमपणे आपल्या पायावर उभे करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांचाही आशीर्वाद या उपक्रमाला लाभला ही भाग्याची गोष्ट असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तर दिव्यांग बांधवांसाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. वार्षिक अर्थसंकल्पाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. मात्र, या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्यावर्षी मेळावे घेऊन लाभार्थ्यांची यादी निश्चित केली आणि सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. अखेर वर्षभराच्या प्रयत्नांना आज फळ मिळाल्यामुळे आज समाधानाचा दिवस असल्याचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.