नरेंद्र पवार आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यातील बुद्धीबळाचा सामना ठरला अनिर्णित
कल्याण दि.22 सप्टेंबर :
बुद्धीबळ खेळामुळे केवळ आपली बुद्धीच तल्लख होत नाही तर हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये आयुष्यातील ध्येय साध्य करण्याचीही शक्ती असते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील अधिकाधिक शाळांमध्ये हा खेळ रुजविण्यासाठी बुद्धीबळपटू आणि त्याच्या शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली. (Chess players and teachers should take the initiative to introduce chess in more schools – Former MLA Narendra Pawar)
कल्याणच्या सुप्रसिद्ध न्यू हायस्कूल शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि जनरल एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे. माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या जिल्हास्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
बुद्धीबळ हा केवळ एक खेळ नसून बौद्धिक विकासाचा आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेला हा खेळ आज संपूर्ण जगभर लोकप्रिय असून सर्व वयोगटांमध्ये तो खेळला जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. तर याकडे केवळ एक करमणुकीचा खेळ म्हणून पाहणे हे अतिशय चुकीचे असून बुद्धीबळामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. प्रत्येक चाल विचारपूर्वक करावी लागते, त्यामुळे खेळाडू समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम होतो. नियोजन, रणनीती आणि योग्य वेळी निर्णय घेणे या कौशल्यांचा विकास होत असल्याने आयुष्यातील ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हा खेळ अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत नरेंद्र पवार यांनी शाळेच्या प्राचार्या ज्योती लोहार मॅडम यांचे विशेष कौतुक केले.
बुद्धीबळ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा आणि एकाग्रतेचा विकास होण्यास मदत-केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल
बुद्धीबळ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा आणि एकाग्रतेचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी,विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या 350 शाळांमधील तब्बल दिड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
नरेंद्र पवार आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यात झाला बुद्धीबळाचा रंगतदार सामना
दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल या दोघांमध्ये झालेला बुद्धीबळाचा सामना चांगलाच लक्षवेधी ठरला. या दोघांनीही एकमेकांना तोडीस तोड चाली करत एकमेकांवर मात करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र दोघांनीही हे सर्व प्रयत्न तितक्याच ताकदीने आणि चाणाक्षपणे परतवून लावल्याचे दिसून आले. अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना अखेर वेळेअभावी बरोबरीत सोडवण्यात दोघांनाही यश आले.
या उद्घाटन सोहळ्याला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, कार्यवाह विकास पाटील, शाळा समिती अध्यक्ष प्रदीप गोसावी, संचालक मंडळ सदस्य साळी सर, राधाकृष्ण पाठक, सुनील पाटील, वैशाली पाटील, न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती लोहार, उपप्राचार्य दिलीप वाघ यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.