Home ठळक बातम्या ‘मुले पळवणारी टोळी’ ही निव्वळ अफवा – डीसीपी सचिन गुंजाळ

‘मुले पळवणारी टोळी’ ही निव्वळ अफवा – डीसीपी सचिन गुंजाळ

 

कल्याण दि. २२ सप्टेंबर :
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत ‘ मुले पळवणाऱ्या टोळीचा मेसेज सोशल मिडीयावरून वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. मात्र हा सर्व प्रकार म्हणजे निव्वळ अफवा असून पालकांनी त्यावर विश्वास न ठेवण्याचे तसेच अशी काही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आई वडिलांच्या मनामध्ये मोठी धडकी…

मुले चोरणाऱ्या टोळीच्या व्हायरल मेसेजमूळे गेल्या २-३ दिवसांपासून कल्याणमधील शिक्षक, पालक आणि लहान मुलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी काही शाळांनी तर मधल्या सुट्टीत मुलांना शाळेच्याच आवारातही जाण्यास मज्जाव केला आहे. तर एकट्याने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या, आई वडिलांच्या मनामध्ये तर मोठी धडकी भरली आहे.

जवळच्या पोलिसांना किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा…

या सर्व प्रकारासंदर्भात कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना विचारले असता त्यांनी हा सर्व प्रकार म्हणजे निव्वळ अफवा असून पालकांनी अजिबात घाबरून न जाण्याचे आवाहन केले. तसेच अशी कोणती व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पोलिसांची मदत प्राप्त होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सीसीटिव्ही तपासात कोणतीच माहिती मिळाली नाही…

दरम्यान या व्हायरल मेसेजनंतर बाजारपेठ पोलिसांनी संबंधित शाळेच्या परिसरासह आजूबाजूच्या भागातील अनेक सीसीटिव्ही फुटेज तपासले. मात्र या टोळीच्या वर्णनाची कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा गाडी आढळून आली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्यामुळे हा मेसेज केवळ अफवा असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

शाळेचे नाव बदलून मेसेज पोस्ट करणे थांबवा अन्यथा कारवाई…

तर लहान मुलांच्या टोळीचा हाच मेसेज शाळेचे नाव बदलून किंवा दुसऱ्या शाळेचे नाव टाकून काही लोकांकडून सोशल मीडियावर पोस्ट केला जात असून तो व्हायरल न करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच अफवा पसरवून लोकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा