Home ठळक बातम्या ‘सीएम चषक’ क्रिडास्पर्धेत कल्याण जिल्ह्यातून तीस हजार युवकांचा सहभाग – राज्यमंत्री रविंद्र...

‘सीएम चषक’ क्रिडास्पर्धेत कल्याण जिल्ह्यातून तीस हजार युवकांचा सहभाग – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

 

डोंबिवली दि.4 नोव्हेंबर :

युवा वर्गाची सांस्कृतिक, शारिरीक आणि बौद्धिक वाढ होऊन त्यांना सर्वार्थांने सुदृढ करणे हे देश कार्यच आहे. युवावर्ग चार भिंतीच्या आत कोंडला न जाता मैदानी खेळ आणि बौद्धिक गरज ओळखून शक्तिमान युवक घडविण्याचा उद्देश ‘सीएम चषक’ स्पर्धेत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण राज्यातून पन्नास लाख खेळाडू सहभागी होणार असून निव्वळ कल्याण जिल्ह्यातून सुमारे तीस हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कल्याण जिल्ह्यातील सर्व स्पर्धचे नियोजन नगरसेवक आणि भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी केले आहे.

संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2018 ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत स्पर्धा होणार आहे. कल्याण जिल्हा अंतर्गत चार विधानसभा क्षेत्रातील युवक-युवती स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. क्रिकेट, कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, रांगोळी, नृत्य आदी प्रकारात स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक विभागातील शिक्षकवृंद सदर स्पर्धांसाठी सहकार्य करणार आहेत. ग्रामीण तसेच शहर पातळीवरील स्पर्धेतून यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप सोहळा 12 जानेवारी, 2019 रोजी म्हणजे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे दिवशी “राष्ट्रीय युवा दिनी” नागपूर येथे होणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तळागाळातील ‘हिरा’ चकाकणार असून तो ‘सीएम चषक’ मानकरी ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत भाजपा जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आ. गणपत गायकवाड, माजी आमदार रमेश पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, शशिकांत कांबळे, नगरसेवक राहूल दामले, मंडल अध्यक्ष नंदू परब, संजीव बिडवाडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*