कल्याण डोंबिवली दि.11 डिसेंबर :
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अवघ्या काही दिवसांसाठी येऊन नंतर अचानक गायब झालेल्या गुलाबी थंडीने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकडे आपली पावले वळवली आहेत. म्हणूनच तर आज यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा थेट 13 अंशांपर्यंत खाली घसरला आहे. कल्याण डोंबिवलीसोबतच आसपासच्या शहरी आणि ग्रामीण भागातील तापमानातही लक्षणीय घट झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (Cold Wave Grips Kalyan-Dombivli; Temperature Drops to 13°C)
यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला या गुलाबी थंडीने कल्याण डोंबिवलीमध्ये आपली हजेरी लावली होती. साधारणपणे पाच सहा दिवस मुक्काम केल्यानंतर मग निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे ही थंडी अचानक गायब झाली. मात्र पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीच्या सुमारास काहीसा गारवा जाणवत आहे. एकीकडे दिवसाचा पारा थेट 33- 34 अंशापर्यंत जात असताना रात्रीचा हा गारवा या उन्हाच्या तडाख्यावर आल्हाददायक फुंकर
घालण्याचे काम करत आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी कल्याण डोंबिवलीमध्ये नोंदवल्या गेलेल्या तापमानाचा विचार करता यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. कल्याणात अवघ्या 13 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत त्यापेक्षा काहीसे अधिक म्हणजे 13.7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.
या कारणामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री गारठा…
डिसेंबर महिन्यात थंडी वाढणे ही सामान्य बाब आहे. अँटीसायक्लोन (उच्च दाब) प्रणाली सक्रिय असल्यामुळे ईशान्येकडील कोरडी हवा, त्यातून कमी झालेली आर्द्रता आणि स्वच्छ, सूर्यप्रकाशित वातावरण — ह्या सर्वांचा परिणाम म्हणून रात्री तापमानात जाणवणारी घट होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. मात्र, ह्याच अँटीसायक्लोनच्या प्रभावामुळे दिवसा कडक ऊन पडते आणि त्यामुळे पारा पुन्हा ३३–३४°C पर्यंत पोहोचतो.
आज सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान…
कल्याण – 13°C
डोंबिवली – 13.7°C
पनवेल – 13°C
बदलापूर – 10.7°C
कर्जत – 10.8°C
नवी मुंबई – 14.2°C
विरार, चिपळूण – 14°C
ठाणे – 14.6°C
डहाणू – 15.2°C
मुंबई (SCZ) – 15.6°C
रत्नागिरी – 17.2°C
माथेरान – 17.4°C
दापोली – 10.9°C
खेड़ – 11°C
महाबळेश्वर – 11.1°C
मनोर – 11.4°C
नागोठणे – 11.8°C
लोणावळा – 11.9°C
आंबोली – 10.4°C

