Home Uncategorised स्मार्ट सिटीअंतर्गत केडीएमसी क्षेत्रात सुरू असणारी कामे योग्य वेळेत पूर्ण करा –...

स्मार्ट सिटीअंतर्गत केडीएमसी क्षेत्रात सुरू असणारी कामे योग्य वेळेत पूर्ण करा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

कल्याण दि.6 जानेवारी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र शासनाच्या निधीतून असलेल्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या कामांचा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आढावा घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत देशभरातील महत्वाच्या शहरांना उत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. याअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार टाऊन पार्क, सिटी पार्क विकसित करणे, काळा तलाव आणि परिसराचे सुशोभीकरण, कल्याण स्टेशन परिसर सुधारणे अशी अनेक कामे सुरु आहेत. या कामांचा आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती काय आहे, कामे पूर्ण होण्यास येणारे अडथळे यांची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली.

यावेळी कपिल पाटील यांनी कल्याण रेल्वे स्थानक, भगवा तलाव, सिटी पार्क (गौरीपाडा) तसेच वाडेघर सर्कल ते रिंग रोड ते बारावे- आंबिवली- टिटवाळा या ठिकाणी स्वतः पाहणी करून संपूर्ण माहिती घेतली.

ही कामे योग्य वेळेत पूर्ण व्हावीत जेणेकरून आपण मोदीजींच्या स्वप्नातील स्मार्ट शहरे उभारू शकू, अशी सूचना  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा