Site icon LNN

करिअर निवडताना बाजारपेठेतील मागणीचा विचार आवश्यक ; विद्यार्थ्यांनी चार पर्याय तयार ठेवावेत – शिक्षण तज्ञ समीर हडप

ब्राह्मण सभा क्रीडा समिती आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दहावी – बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

कल्याण | ८ जून :
ब्राह्मण सभा क्रीडा समिती, कल्याण आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी- बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कल्याण पश्चिमेतील पंडितवाडी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी, बदलते शैक्षणिक प्रवाह आणि जागतिक रोजगार बाजारपेठेतील मागणी याबाबत शिक्षणतज्ञ समीर हडप यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. (Consider Market Demand While Choosing a Career; Students Should Keep Four Career Options Ready – Education Expert Samir Hadap)

तत्पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ब्राह्मण सभा अध्यक्ष मुकुंद बापट, उपाध्यक्ष पंकज दांडेकर, कार्यवाह भालचंद्र जोशी, शिक्षण तज्ञ समीर हडप, सकाळचे उपसंपादक सारंग केळकर, पंकज दांडेकर या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या आवडीचा विषय निश्चित करावा, पारंपरिक करिअरच्या पलीकडेही आज अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी खुल्या मनाने विविध पर्यायांचा विचार करण्याची गरज समीर हडप यांनी व्यक्त केली. तर इयत्ता अकरावी-बारावीत गणित विषय घेतल्यास देश-विदेशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी मोठा फायदा होतो. तसेच पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या शाखांतील विद्यार्थ्यांनी विविध करिअर अभिरुची आणि कौशल्य चाचण्या देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एमबीबीएस हा जगातील सर्वाधिक खर्चिक आणि वेळखाऊ अभ्यासक्रमांपैकी एक असून वैद्यकीय क्षेत्रात यशस्वीपणे स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. केवळ एमबीबीएस पुरेसे नसून एमडी किंवा एमएससारख्या उच्च शिक्षणाची आवश्यकता असते. भारतात या अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाच करिअरवर अवलंबून न राहता किमान चार पर्याय तयार ठेवावेत, असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रांव्यतिरिक्त बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी, पर्यावरण विज्ञान, बायोइन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक काउन्सेलिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगत बायोइन्फॉर्मेटिक्स हा गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर सर्वाधिक मागणी असलेल्या अभ्यासक्रमांपैकी एक ठरत असून भविष्यात त्याचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे अधोरेखित केले.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संगणक भाषा आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स, इकॉनॉमिक्स, क्लायमेट चेंज, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट कन्सल्टिंग, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्येही भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही सांगत एनडीए आणि सीडीएससारख्या पर्यायांचाही विचार करण्याचे आवाहन केले.

कोरोनानंतर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र अधिक खर्चिक होत चालले असून बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी सतत स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अतिरिक्त कौशल्ये विकसित करणे गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभा समितीचे अध्यक्ष सीए मुकुंद बापट, उपाध्यक्ष पंकज दांडेकर, भालचंद्र जोशी, प्रसाद काणे, अपर्णा जोशी यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version