Home ठळक बातम्या गरिबांचे पोट भरण्यासाठी कल्याणच्या खाडीचा ‘असाही’ हातभार

गरिबांचे पोट भरण्यासाठी कल्याणच्या खाडीचा ‘असाही’ हातभार

कल्याण दि.18 ऑक्टोबर :
कल्याणची खाडी…छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची साक्षीदार…त्यासोबतच प्राचीन काळी देशातील प्रमूख जलमार्गांपैकी एक अशीही या खाडीची ओळख. मात्र काळाच्या ओघात ही ओळख काहीशी पुसट झाली असली आणि जलप्रदूषणामुळे खाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी ‘लोकांच्या उदरभरणा’चा वसा ही खाडी आजही जपत असल्याचे दिसत आहे.

कल्याण – भिवंडी मार्गावरील कोन गावात राहणारे मंगल गावडे कुटुंबिय. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? या विवंचनेत असणाऱ्या गावडे कुटुंबियांसाठी कल्याणची खाडी ही मोठा आधार ठरत आहे. कल्याणच्या खाडीमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात देव -देवतांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यासोबतच एरव्ही खाडीकिनाऱ्याच्या काठावर अर्थातच गणेश घाटावर विविध धार्मिक विधीही होत असतात. त्यामुळे निर्माल्यासोबतच काही जण बऱ्याचदा सुट्टे पैसे ( नाणी) आणि कधी कधी सोनं, चांदीही खाडीमध्ये सोडत असतात. ते शोधून काढत गावडे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.

खाडीला दररोज ठराविक वेळेनुसार भरती आणि ओहोटी येत असते. त्यात ओहोटी लागल्यानंतर पुन्हा भरती येईपर्यंतच्या काळांत मंगल गावडे या खाडीतून पैसे शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याजवळ असणाऱ्या पसरट थाळीसदृश्य भांड्याच्या सहाय्याने खाडीचा गाळ उपसतात आणि त्यात मग त्यांना काही वेळा सुट्टे पैसे, नाणी किंवा धातूच्या वस्तू सापडतात. गेल्या काही वर्षांपासून आपण हे काम करत असून आपल्याला दररोज सुमारे 200 ते 300 रुपये सापडत असल्याचे मंगल गावडे यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. तर कधी कधी नशीब चांगले असेल तर सोनं – चांदीही मिळत असल्याचे ते म्हणाले.

हे वाचायला आणि ऐकायला काहीसं सोपं काम वाटत असलं तरी त्यामागची त्यांची मेहनत मात्र थक्क करणारी आहे. खाडीच्या भरती आणि ओहोटीच्या वेळांवर त्यांचं हे काम अवलंबून असून खाडीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातही भरती-ओहोटी येत असते. त्याचा अंत आणि ठाव त्या खाडीलाही माहीत नाही आणि त्याप्रमाणेच मंगल गावडेलाही.

– केतन बेटावदकर

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा