ऊर्जा बचत, कार्यक्षमता-सौर ऊर्जा वापरावरील जनजागृती
कल्याण दि.10 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत येत्या १४ ते २१ डिसेंबरदरम्यान ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ज्याची सुरुवात येत्या रविवारी होणाऱ्या सायकल रॅलीने होणार असून ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील 250 सायकलिस्टने नोंदणी केली आहे. (Cycle Rally by Kalyan-Dombivli Municipal Corporation on the Occasion of Energy Conservation Week; 250 Cyclists to Participate)
१४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते केडीएमसी मुख्यालयापासून ही सायकल रॅली निघणार आहे. यातील प्रत्येक सहभागी व्यक्तीला आकर्षक टी-शर्ट आणि मेडल देण्यात येणार आहे. ही रॅली कल्याण आणि डोंबिवली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरणार असून त्याद्वारे नागरिकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) आणि सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत रा. भागवत यांनी दिली. तसेच
या कार्यक्रमात ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता आणि सौर ऊर्जा वापराबाबत माहिती देणाऱ्या आकर्षक फलकाचे अनावरणही आयुक्त गोयल यांच्या हस्ते केले जाणार आहे.
‘KDMC Steps towards Sustainability and Safety for Society Buildings’ चर्चासत्र…
या सायकल रॅलीनंतर १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रोटरी भवन येथे केडीएमसीच्या फ, ग आणि ह प्रभाग क्षेत्रातील निवासी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त संवाद साधणार आहेत. या चर्चासत्रात टिकाऊ विकासाशी निगडित पाच प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे:
1. कचरा व्यवस्थापन
2. सौर ऊर्जेचा वापर
3. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण
4. सांडपाण्याचा पुनर्वापर
5. वृक्षलागवड
तसेच सुरक्षिततेशी निगडित दोन महत्त्वाच्या विषयांवर, म्हणजेच विद्युत सुरक्षा तपासणी आणि अग्निसुरक्षा संबंधित विभागांचे नोडल अधिकारी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
८ दिवसांत विविध स्तरांवर जनजागृती उपक्रम…
ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान विभागाने खालीलप्रमाणे विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे:
* १५ डिसेंबर– सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती
* १६, १७ व १८ डिसेंबर – शाळा व महाविद्यालयांमध्ये उपक्रम
* १९ डिसेंबर – रेल्वे स्टेशन परिसरात जनजागृती
* २० व २१ डिसेंबर – रहिवासी सोसायट्यांमध्ये उपक्रम
तसेच महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांसाठीही ऊर्जा संवर्धनावर स्वतंत्र चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले.

