Home ठळक बातम्या मोबदल्याच्या मागणीसाठी कल्याण शिळ रोडवरील बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

मोबदल्याच्या मागणीसाठी कल्याण शिळ रोडवरील बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

 

मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह जेल भरोचा आंदोलकांचा इशारा

कल्याण दि.२० सप्टेंबर :
कल्याण शिळ रस्ता रुंदीकरणातील बाधिताना अद्याप मोबदला न मिळाल्याविरोधात नाराज शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आजपासून हे आंदोलन सुरू झाले असून मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह जेल भरो आंदोलनाचा इशाराही बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

कल्याणसह आसपासच्या शहरांना नवी मुंबईला जोडण्यामध्ये कल्याण शीळ मार्गाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. या कल्याण शीळ रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आम्हाला अद्याप मोबदला न मिळाल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. या रस्ता रुंदीकरणामध्ये रस्त्यालगतच्या गावांमधील शेकडो शेतकरी बाधित होत असल्याची माहिती यावेळी सर्व पक्षीय युवा मोर्चा समितीचे सल्लागार गणेश म्हात्रे यांनी दिली. परिणामी बाधितांना हा मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी समितीचे अनेक सदस्य कल्याण शिळ रोडवर उपोषणाला बसले आहेत. तसेच लवकरात लवकर आम्हाला मोबदला मिळाला नाही, तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

तर या मोबदल्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत तत्कालीन पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये यासंदर्भात समिती स्थापन करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री झाले असून त्यांच्या जिल्ह्यातील हा प्रश्न ते नक्कीच सोडवतील असा विश्वास युवा मोर्चाचे गजानन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा